Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Pune › पुणे : रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीसाठी मनसेचे धरणे

पुणे : रस्त्यांवरील खड्डे दुरूस्तीसाठी मनसेचे धरणे

Published On: Jul 13 2018 2:51PM | Last Updated: Jul 13 2018 2:51PMपिंपरी : प्रतिनिधी 

पावसाळ्याच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. परिणामी, लहान-मोठ्या अपघाताची संख्या वाढली आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनाबाहेर गुरूवारी (दि.१२) धरणे आंदोलन करण्यात आले. रस्त्यांचे खड्डे त्वरित न बुजविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

‘शहरातील रस्त्यांची चाळण’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने शहरातील विविध ठिकाणच्या ९ छायाचित्रांसह ठळक वृत्त बुधवारी (दि.११) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मनसेने दुसर्‍या दिवशी गुरूवारी आंदोलन केले. पालिका भवनातील आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनाबाहेर धरणे धरण्यात आले. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अहिंसा चौक, चिंचवड येथे खड्डा चुकविताना दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे रोजीपर्यंत शहरातील सर्व रस्ते दुरूस्तीची प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र, पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून दुरूस्तीची कामे झालेली नाहीत. परिणामी, वाहनचालकांसह पादचार्‍यांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला आहे. 

शहरातील सर्व रस्ते तात्काळ दुरूस्त करावेत अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष चिखले यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिला आहे. आंदोलनामुळे पालिका भवनात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. आंदोनलकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात राजू सावळे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, रूपेश पटेकर, संजय यादव, सीमा बेलापूरकर, शांतीलाल दहीफळे, अश्‍विनी बांगर, के. के. कांबळे, अनिता पांचाळ, विशाल मानकरी, संगीता देशमुख, विष्णू चावरीया, रूपा गिलबिले, प्राजक्ता गुजर आदींनी सहभाग घेतला.