Mon, Apr 22, 2019 23:51होमपेज › Pune › स्थायी समिती अध्यक्षांचीच पहिली चिठ्ठी

स्थायी समिती अध्यक्षांचीच पहिली चिठ्ठी

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:55AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांची चिठ्ठी पत्रकारांच्या हस्ते काढण्यात आली. त्यात विरोधकांच्या आरोपांच्या गर्तेत अडकलेल्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची चिठ्ठी सर्वांत प्रथम निघाल्याने त्या समितीतून बाहेर पडल्या आहेत. त्यासह भाजपचे  कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, उषा मुंढे, कोमल मेवानी, आशा शेंडगे हे भाजपाचे सहा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर हे सदस्य समितीतून बाहेर पडले. 

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात नगरसचिव विभागाने चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया पार पडली. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व प्रक्रिया सांगितली.  प्रथम सर्व 16 सदस्यांची नावे पांढर्‍या रंगाच्या चेंडूत टाकण्यात आली. हे सर्व चेंडू पारदर्शक बरणीत टाकून फिरवण्यात आले. त्यातून पत्रकारांच्या हस्ते एक-एक चेंडू बाहेर काढण्यात आला. 

त्यात पहिला चेंडू समिती अध्यक्षा सावळे यांचाच निघाली. त्यापाठोपाठ कुंदन गायकवाड, उषा मुंढे, कोमल मेवानी या भाजपच्या चार सदस्यांच्या चिठ्ठ्या निघाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे व वैशाली काळभोर यांची चिठ्ठी बाहेर पडली. पाठोपाठ भाजपचे हर्षल ढोरे व आशा शेंडगे यांच्या नावाचे चेंडू बाहेर पडले.  या सर्व आठ सदस्यांचा एका वर्षाचा कार्यकाल पार पडला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे राजू मिसाळ व मोरेश्‍वर शेडगे हे गैरहजर होते. त्यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने ते ‘लकी’ असल्याची चर्चा महापालिकेत होती. 

महापालिकेचे आर्थिक नियंत्रण स्थायी समितीच्या हातात असते. शहराच्या विकासाचे नियोजन स्थायी समितीमध्ये केले जाते. अनेक धोरणात्मक निर्णय ‘स्थायी’त घेतले जातात. त्यामुळे स्थायी समितीत सदस्य म्हणून येण्यासाठी नगरसेवक अधिक उत्सुक असतात. फेबु्रवारीच्या 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेत नव्या सदस्यांची नावे जाहीर केली जातील. त्यासाठी भाजपसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी केली आहे. 

भाजपचे माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, राष्ट्रवादीचे मिसाळ, भोडवे, शिवसेनेचे अमित गावडे, अपक्ष कैलास बारणे  यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने ते नशीबवान ठरले आहेत.