Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Pune › मतिमंद मुलीवर शिपायाचा बलात्कार

मतिमंद मुलीवर शिपायाचा बलात्कार

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 1:18AM

बुकमार्क करा

शिक्रापूर : प्रतिनिधी  

पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय मतिमंद मुलीवर शाळेतील शिपायानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडित मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिक्रापूर पोलिसांनी पाबळ येथील मतिमंद मुलांच्या शाळेचे शिपाई बाळूमामा उर्फ रामदास ज्ञानोबा लष्कर (रा. पाबळ, ता. शिरूर)  याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 376 तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4 अन्वये गुन्हा दाखल केला  आहे. पीडित मुलीवर दबाव टाकला  म्हणून मनीषा (पूर्ण नाव माहीत नाही) या महिला कर्मचार्‍यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. युवती ही मतिमंद आहे. मुलगी मतिमंद असल्यामुळे तिच्या पालकांनी तिला पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केले होते. पीडित मुलगी आजारी असल्याने तिच्या पालकांनी तिला घरी नेले होते, परंतु तिची तब्बेत बरी झाल्याने तिला पुन्हा 21 डिसेंबर रोजी पाबळ येथे आणून सोडले होते.

त्यांनतर 22 तारखेला तिला त्रास होऊ लागला, त्यामुळे तिला शिक्षकांनी पाबळ येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर तिच्या पालकांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. तिच्या पालकांनी तातडीने पाबळ येथे येत मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान, वेळोवेळी रात्रीच्या सुमारास पीडितेला झोपेतून उठवून टीव्हीच्या खोलीमध्ये नेऊन अनेक वेळा अत्याचार केला. 

आरोपी मनीषा हिने सदर प्रकाराची वाच्यता न करण्याची पीडित मुलीला धमकी दिली. तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.