Thu, Apr 25, 2019 17:12होमपेज › Pune › पुण्यातील रस्त्यांवर रात्र-दिवस पे अ‍ॅन्ड पार्क

पुण्यातील रस्त्यांवर रात्र-दिवस पे अ‍ॅन्ड पार्क

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:55AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतुक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपुर्ण शहरभर पे अ‍ॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाने धोरण तयार केले असून  त्यानुसार शहरातील रस्त्यांवर दिवसाबरोबरच रात्रीही  पे अ‍ॅण्ड पार्क करण्यात येणार आहे. त्यासाठी शहराचे झोन करण्यात आले असून त्यानुसार दुचाकीसाठी तासाला 10 ते 20  रुपये तर चारचाकी  50 ते 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरात पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्यासाठी प्रशासनाने तयार केलेले धोरण स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. येत्या मंगळवारी त्यावर निर्णय होणार आहे. या धोरणानुसार  शहरातील प्रत्येक  रस्त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावरील वाहनांची संख्या, नागरिकांची रहदारी व गर्दी विचारात घेवूनत्यानुसार पे अ‍ॅन्ड पार्कचे झोन निश्‍चित करण्यात आले आहेत. 

अ, ब, क अशा पध्दतीने हे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग,  ब मध्ये तीव्र वर्दळ आणि क मध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे.  त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. 

दुचाकीला  रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी 10 रुपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी 20 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी 50 आणि 100 रुपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी  रात्री10 ते सकाळी 8 असा कालावधी असेल. 50 रुपये एका दिवसासाठी आकारण्यात येतील.

रात्रीच्या वेळी पे अ‍ॅन्ड पार्क

रात्रीच्या वेळेस अनेक वाहने रस्त्यावर लावण्यात येतात. पेठांमधील काही भागांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांवर ही वेळ येते. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुध्दा रस्त्यावर पे अ‍ॅन्ड पार्क प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचा फटका सोसायट्यांमध्ये पार्किग नसलेल्यांना आता त्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान शहरातील सर्व रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविल्यास रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल असा दावा प्रशासनाचा करण्यात आला आहे. त्याचबरोबर पार्किंग शुल्कातून महापालिका प्रशासनाला महसूल सुध्दा मिळणार आहे.