Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Pune › राजगडावर पार्टीच्या आयोजनाने पोलिसांची झोप उडाली

राजगडावर पार्टीच्या आयोजनाने पोलिसांची झोप उडाली

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:18AMखडकवासला : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्याचा निम्म्याहून अधिक काळ व्यतीत केलेल्या व हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून जगभर लौकिक असलेल्या किल्ले राजगडावरील तथाकथित पंचतारांकित पार्टीमुळे वेल्हा पोलिसांची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे राजगडाच्या शिवकालीन पायरी मार्गापासून गडाच्या माथ्यापर्यंत चोहो बाजूस मालकी असलेल्या पुरातत्त्व खात्याला पार्टीचे आयोजक सापडत नसल्याने पुरातत्त्व खाते हतबल झाले आहे.

दरम्यान राष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांच्या राजगडावर कोणत्याही पार्टीच्या आयोजनाला परवानगी देऊ नये. तसेच राजगडावर पार्टी आयोजित करणार्‍या तसेच तसे मेसेज पाठवणार्‍यांवर  तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक मावळा जवान संघटनेने केली आहे.

शनिवारी (दि. 10) राजगडावर या पंचतारांकित पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याने कोणतीही परवानगी दिलेली नाही. तसेच पोलिस खात्यानेही  मंजुरी दिली नाही. असे असताना राजगडावरील तथाकथित पंचतारांकित पार्टीचे मेसेज राजगडाच्या फोटोसह फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपवर गेल्या  दोन आठवड्यांपासून फिरत आहेत.  वेल्हा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विकास बडवे व पोलिस गणेश लडकत हे गेल्या दहा- बारा दिवसांपासून राजगडावरील तथाकथित पंचतारांकित पार्टीच्या आयोजकांचा शोध घेत आहेत. अलीकडच्या काळात राजगडाच्या परिसरात हॉटेल्स, ढाबे, खाजगी फार्म हाऊसची संख्या वाढली आहे. त्यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली. तसेच पुरातत्त्व खात्यालाही याबाबत पत्र दिले. मात्र पार्टीच्या आयोजकांचा शोध लागला नाही. 

 गणेश लडकत म्हणाले, की अद्याप पार्टीच्या आयोजकांचा शोध लागला नाही. गडावर मद्यपानासह मटण मांसाहार तसेच कसल्याही पार्टीला मनाई आहे. त्यामुळे अशी पार्टी गडावर होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी संबंधित विभागांना कळविले आहे. पुरातत्त्व खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक विलास वाहणे म्हणाले, की वेल्हा पोलिसांनी याबाबत पत्र दिले आहे. मात्र पुरातत्त्व खात्याने कोणत्याही संस्थेला तसेच आयोजकांना राजगडावर  पार्टीस परवानगी दिलेली नाही. राजगडाचा फोटो वापरून राजगडावर आलिशान, पंचतारांकित पार्टी अशी पोस्ट फेसबुकवर पाहिली आहे. मात्र आयोजकांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे याबाबत विचारणा करता आली नाही.