Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Pune › पुणेः पार्किंगच्या वादातून इंजिनियरचा खून

पुणेः पार्किंगच्या वादातून इंजिनियरचा खून

Published On: Jan 20 2018 5:35PM | Last Updated: Jan 20 2018 5:38PMपुणेः प्रतिनिधी 

प्रवाशी वाहतूक करणारी वाहने बंगल्यासमोर पार्क करण्याच्या वादातून संगणक अभियंत्या तरुणाला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना लुल्लनगर परिसरातील सहाणी सुजाण पार्क भागात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

नेवल बोमी बत्तीवाला (31, सहाणी सुजाण पार्क, लुल्लानगर कोंढवा) असे मयत संगणक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश जयवंतराव रासकर (31), योगेश दिनू कडवे (22, मोहित टॉवर, सहानी सुजाण पार्क लुल्लानगरकोंढवा), विक्रम लक्ष्मण भोंबे (32,रासकर पॅलेसमागे, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार मुनीर अब्बास इनामदार यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवल यांचा कोंढवा परिसरातील  लुल्लानगर येथे सहाणी पार्कमध्ये बंगला आहे.  रासकर, कडवे, भोंबे यांची प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. ते नेवल याच्या बंगल्यासमोर त्यांची वाहने पार्क करत होते. या कारणावरून नेवल व तिघांमध्ये वाद झाले होते. 

दरम्यान शुक्रवारी (दि.19) त्यांनी पुन्हा नेवल यांच्या घरासमोर त्यांची वाहने पार्क केली. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यांनी आपण प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी असल्याचे नेवल यांना सांगितले. नेवल यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यानंतर तिघांनी नेवल यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना दगड फेकून मारला. नेवल या मारहाणीत गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. दरम्यान गंभीर जखमी नेवल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ पसार झालेल्या तिघांनाही अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक ए. एम. सोनवणे पुढील तपास करत आहेत.