होमपेज › Pune › जातीय गट कमी झाल्यास महाराष्ट्र पाणीदार : मुख्यमंत्री

जातीय गट कमी झाल्यास महाराष्ट्र पाणीदार : मुख्यमंत्री

Published On: Aug 12 2018 7:40PM | Last Updated: Aug 12 2018 7:40PMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील गावा गावात असलेले जातीय गट कमी करून जलसंधारणाची लोकचळवळ निर्माण केल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित वाटर कप २०१८ स्पर्धेतील विजेत्या गावांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आहे. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्य मंत्री राम शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमख्यमंत्री अजित पवार, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते अमीर खान, किरण राव, फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ आदी या वेळी उपस्थित होते. 

यावेळी फडणवीस म्हणाले,  जलसंधारणाचे काम न होण्यामागे नागरिकांना दोषी धरता येणार नाही. मात्र गावागावांतील गटतट, जातीपाती, आणि राजकीय पक्षांमुळे  जलसंधारणासाठीचा 'पाणी अडवा, पाणी जिरवा' चा नारा 'इतरांना अडवा आणि त्यांची जिरवा' असा झाला. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरायला हवे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

फडणवीस म्हणाले लोकचळवळीशिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. परंतु, गावागावांतील गट-तट, जात-पात आणि पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहत नाही. हीच गोष्ट पाणी फौंडेशनने हेरली आणि पाणी प्रश्नाचे उत्तर लोकचळवळीत असल्याचे सांगत समाज एकत्र केला. त्यातून पाणी फाऊंडेशनचे जलसंधारणाचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. परिवर्तन कोणी बाहेरून येऊन करत नाही. सामान्य माणसाचे असामान्यत्व जागृत झाल्यावर असामान्य कार्य घडते. त्यातूनच परिवर्तन घडते. पाणी फाउंडेशनने नागरिकांमधून हे असामान्यत्व जागृत करण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाविषयी बोलताना अजित पवार यांनी पीक पॅटर्न बदलण्याची गरज आहे. उसासारखी पिके घेतली तर हा दुष्काळ कधीच दूर होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. वॉटर कपच्या निमित्ताने लोक पाणीप्रश्नावर एकत्र येतात, ही फारच महत्त्वाची बाब आहे. आमीर यांच्या या कामामुळे महाराष्ट्र पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

बोलघेवड्या लोकांना काही करायचं नसतं : अजित पवार

बोलघेवड्या लोकांना फार काही करायचे नसते. त्यांना काही दाखवयाचं नसतं. त्यांची एखादी सभा झाली की निघून जायचं असतं, अशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर दिले. १९६० ते २०१८ या कालावधीत झालेला सिंचनाचा निधी कुठे मुरला? तो जर मुरला नसता तर महाराष्ट्राची पाण्याची पातळी खाली गेली नसती, अशी टीका राज यांनी केली.

राज ठाकरे हे भाषण करून निघून गेले. त्यानंतर अजित पवार हे भाषणाला उभे राहिले. त्यांच्या जिव्हारी राज यांची टीका लागलेली होतीच. त्यांनी थेट राज यांचे नाव घेतले नाही. मात्र बोलघेवड्या लोकांना फार काही करायचं नसतं, असं टोला अजित पवार यांनी लगवाला. 


मी आतापर्यंत कधी सत्ताधारी म्हणून सरकारमध्ये नसल्याने मला फावडे कसे वापरायचे हे माहीत नाही. मात्र कुदळ कशी मारायची, हे माहीत आहे.  1960 ते 2018 या कालावधीत झालेला सिंचनाचा निधी कुठे मुरला? तो जर मुरला नसता तर महाराष्ट्राची पाण्याची पातळी खाली गेली नसती.

- राज ठाकरे

कोणताही शिक्‍का नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र अमिर खान यांच्यासोबत आहे. त्यांच्या कामामुळे महाराष्ट्र पाणीदार होण्यास मदत होईल. त्यांनी कधी राजकीय व्यासपीठावर जाऊ नये. बोलघेवड्या लोकांना फार काही करायचे नसते. त्यांना काही दाखवयाचं नसतं. त्यांची एखादी सभा झाली की निघून जायचं असतं. 

- अजित पवार

मागील काही वर्षांपूर्वी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची घोषणा देण्यात आली होती. त्यातून जलसंधारणाची कामे करण्याची अपेक्षा होती. मात्र, गावागावांत एवढे गट-तट, धर्म-जात यामुळे ‘माणसं अडवा आणि त्यांची जिरवा’ असे झाले आहे. या कुरघोड्यांमुळे गावाचा विकास रखडला आहे.

- देवेंद्र फडणवीस

वाटर कप स्पर्धेतील पारितोषिक विजेते

१) पहिले पारितोषिक - टाकेवाडी, माण सातारा  ७५ लाख रु पारितोषिक

दुसरे विभागून 

१) सिडखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा  २५ लाख
२) भांडवली, ता. माण, जि. सातारा २५ लाख

तिसरे पारितोषिक विभागून

१) आनंदवाडी, ता. आष्टी, जि. बीड २० लाख
२) उमठा, ता. लारखेड, जि. नागपूर  २० लाख