होमपेज › Pune › वाल्मीकींच्या तपोभूमीत रामनामाचा गजर!

वाल्मीकींच्या तपोभूमीत रामनामाचा गजर!

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:10PMवाल्हे : 

खंडोबाच्या जेजुरीनगरीतून गुरुवारी (दि. 12) सकाळी पालखी सोहळा महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हे गावाकडे प्रस्थान होऊन दौंडज खिंडीतील भाजी-भाकरीचा आस्वाद घेऊन वाल्मीकनगरीत तब्बल साडेबारा वाजता पोहोचला. वाल्हेकर ग्रामस्थांचे स्वागतही न स्वीकारता पालखी तळाकडे मार्गस्थ झाली. मात्र, गाड्यांची गर्दी व वाहतुकीतील विस्कळीतपणामुळे पालखी तळावर सव्वादोन वाजता पोहोचली.

 वैष्णवांच्या मनी  मात्र वरुणराजााची हजेरी व टाळ-चिपळ्यांच्या संगतीने ‘रामनाम जपा हरी मुखे म्हणा’सह अनेक हरिपाठ व अभंगवाणीने पुरती वारी भक्तिसागरात न्हाऊन निघाली. तासन्तास वाहतूक ठप्प झाल्याने अनेक दिंड्यांनी टाळ-चिपळ्यांच्या निनादात वारी भक्तिमय केली.

कीर्तन श्रेष्ठ कलियुगींसेविई ।
तरले पत्की ते देवा ॥
वाल्हा तारिला कीर्तनीं ।
पावन जाला त्रिभुवनी ॥

गोविंद ऋषींच्या समाधीस्थळी दौंडजनगरीत सोहळा सव्वावाजता पोहोचला. यावेळी दौंडजच्या सरपंच रेखा जाधव, उपसरपंच नीलेश भुजबळ, ग्रामसेवक अनिल हिरास्कर, जगन्नाथ कदम, लक्ष्मण दगडे, अमोल कदम, सागर भोसले यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी वारकर्‍यांनी मात्र अभंग व रामनामाचा जपाने वेळ भक्तीत रंगवला.

वाल्मिकींच्या तपोभूमीत मानाचे नगारखाना आल्यानंतर अश्‍व व सर्व सोहळाच थांबला. राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती; स्वागत घेण्यासही रथ न थांबल्याने अनेकांनी फुले रथावर टाकून हात जोडले.

पालखी सोहळा सव्वाबारा वाजता पालखी तळाकडे प्रस्थान होऊन नेहमीप्रमाणे एक वाजता न पोहोचता तो सव्वादोन वाजता पोहोचला. वाल्मिकींच्या तपोभूमीतील समाजआरती ही वारकर्‍यांसाठी व ग्रामस्थांसाठी एक आनंद सोहळा असतो; पावसाच्या सरीमध्ये ही समाज आरती उत्साहात पार पडली.