Wed, Mar 27, 2019 03:59



होमपेज › Pune › पाणीपुरीच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट

पाणीपुरीच्या कारखान्यात सिलिंडरचा स्फोट

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:06AM

बुकमार्क करा





पंचवटी : वार्ताहर 

मुंबईतील फरसाणच्या कारखान्याला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच नाशिकमधील हिरावाडीतील एका पाणीपुरीच्या कारखान्यात दोन सिलेंडरचा स्फोट होऊन या दुमजली इमारतीला आग लागली. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, इमारतीला अक्षरश: तडे गेले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सिलींडरमधून गॅस गळती सुरु झाल्याचे वेळीच लक्षात घेऊन कामगारांनी तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरावाडीतील शिवकृपानगर येथील एका पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावर अखिलेश केशव चौहान यांचा पाणीपुरी बनविण्याचा कारखाना आहे. कारखान्यात पाणीपुरी बनविण्याचे काम सुरू असतानाच मंगळवारी (दि.26) पहाटे साडेपाचच्या सुमारास सिलिंडरच्या नळीने पेट घेतला. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा भडकल्या़ त्यात गच्चीवरील खाद्यतेलाच्या डबेही पेटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. गच्चीवरील भरलेल्या चार सिलींडरपैकी दोन सिलींडर आगीच्या विळख्यात सापडल्याने या दोन सिलींडरचा स्फोट झाला. स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला होता.  

सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली तर काहींनी लागलीच अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली़  या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गच्चीवरील कारखान्यातून आगीच्या ज्वाळा व प्रचंड धूर निघत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याच्या सहाय्याने सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आणली. सिलींडरच्या स्फोटाने या इमारतीला अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेल्याने इमारत धोकादायक बनली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे .