Wed, Nov 21, 2018 19:25होमपेज › Pune › टाक्यांना सत्ताधार्‍यांचीच आडकाठी

टाक्यांना सत्ताधार्‍यांचीच आडकाठी

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी

समान पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाक्यांच्या कामांना सत्ताधार्‍यांकडूनच ग्रहण लागले आहे. अनेक ठिकाणी या पक्षाच्या नगरसेवकांनी टाक्यांच्या कामाला खो घातला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. 

महापालिकेकडून शहरासाठी राबविण्यात येणार्‍या समान पाणी पुरवठा योजनतेंर्गत जवळपास 100 पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यामधील 85 टाक्यांच्या कामाला डिसेंबरपासूनच सुरवात झाली आहे.  या टाक्या महापालिकेच्या जागेत  उभारण्यात येत आहेत. मात्र, यामधील काही  ठिकाणाची कामे बंद पडली असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क भागात उभारण्यात येणार्‍या पाण्याच्या टाकीतून शेजारच्या प्रभागाला पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे येथील एका स्थानिक माननीयाने या कामाला विरोध दर्शविला आहे. त्यासाठी ठेकेदाराला त्रास देण्याचे उद्योग केले जात आहेत. 

तर  गुलटेकडी येथील क्रिसेंट हायस्कूलच्या जवळ 50 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या उभारणीचे काम दोन महिन्यांपुर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी लगतच्या सोसायटीची ऍमेनिटी स्पेसची जागा ताब्यात घेण्यात आली आहे. ही जागा रस्त्याच्या कडेलाच असून त्यामागील बाजूस मोकळी जागा आहे. या जागेच्या मालकाने त्याची जागाही महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा रस्त्याच्या कडेची जागा त्याला देउन त्याच्या जागेवर टाकी उभारावी, अशी गळ पालिकेतील या भागातील माननीयांनी घातली आहे. 

स्वारगेटला मेट्रोचा अडथळा

स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाच्या जागेत तीन टाक्यांचे काम सुरू होते. येथील काही जागा मेट्रोच्या स्टेशनसाठी देण्यात आली आहे. मात्र, आता मेट्रोने सर्वच जागेची मागणी केली असल्याने या टाक्यांचे कामही रखडले आहे. त्यामुळे  एप्रिलपासून या तीन टाक्यांचे कामही बंद असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली.