Tue, Apr 23, 2019 20:25होमपेज › Pune › वैष्णवांच्या सेवेत रमली उद्योगनगरी

वैष्णवांच्या सेवेत रमली उद्योगनगरी

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:04PMपिंपरी : प्रतिनिधी 

देहूवरून निघालेल्या जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात शुक्रवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. या वारी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध संस्था, सामाजिक संघटना व सार्वजनिक मंडळाच्या वतीने अन्‍नदान, अल्पोहार, पिण्याच्या पाणी व चहा, तसेच खाद्य पदाथार्ंचे वाटप करून सेवा पुरविण्यात आली; तसेच वारकर्‍यांसाठी चप्पल, बूट, बॅग शिऊन देणे, आरोग्य सेवा पुरविणे यासारख्या सेवा करण्यात शहरवासीय रमले होते. 

आई एकविरा फाऊंडेशनच्या वतीने निगडीतील लोकमान्य टिळक चौकात बसस्टॉप शेजारी खिचडी व बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनचे गणेश गोरे, प्रशांत पाटील, मयुर पाटील, लतिश पाटील, मनोहर घोडे, प्रमोद कांबळे, अक्षय निकाळजे, अभिषेक कवठेकर, प्रविण ठोके, संकेत जावळे, स्वरा पाटील, अविनाश शिंदे, ओंकार आसकर आदींनी सर्व नियोजन केले. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. मोहन गायकवाड शिबिरासाठी चिंचवड येथील लक्ष्मी मेडिकल, राहुल मेडिकल, सप्‍तक्षृंगी मेडिकल, सुश्रृत मेडिकल व शिवम मेडिकलने सहकार्य केले. दिवसभरात सुमारे दोन हजार वारकर्‍यांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधांचे वाटप केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगरच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना चहाचे वाटप करण्यात आले. अंकुश घाडगे यांच्या वतीने दरवर्षी याचे संयोजन केले जाते. लघुउद्योजक संघटनेच्या वतीने वारकर्‍यांना फळवाटप व अन्‍नदान करण्यात आले. रूपीनगर येथील श्री घारजाईमाता फळभाजी मंडई संघटनेच्या वतीने बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.  पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मोफत औषधोपचार फिरत्या पथकाची सोय करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे कर्मचारी वारकर्‍यांना सुविधा पुरवित होते. रोहिदास चर्मकार संघटनेच्या वतीने वारकर्‍यांचे फाटलेले बूट, चप्पल, बॅग, पिशव्या शिऊन देत सेवा पुरवली. 

महाराष्ट्र मजदूर संघाच्या वतीने वारकर्‍यांसाठी अन्‍नदान करण्यात आले. या वेळी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक राहुल कलाटे आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्‍ता साने, नाना काटे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर आदीसह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. वारकर्‍यांची सेवा करताना उद्योगनगरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषात तल्लीन झाली होती. 

विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या वतीने भक्‍ती-शक्‍ती चौकातील परिसरात पडलेला कचरा गोळा केला. महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. शिक्षक बाळकृष्ण धुमाळ यांनी याचे नियोजन केले. तर पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग निगडीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिसरातील कचरा गोळा केला. निखील सरवदे यांनी या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वारीमध्ये निगडी येथे रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य करत विविध सामाजिक विषयांची वारकर्‍यांना जाणिव करून दिली.

अपंग विद्यालयाच्या दिंडीला तीस वर्ष पूर्ण 

महाराष्ट्रातील जनतेला सुख समृध्दी मिऴावी, भरपूर पाउस पडावा तसेच शेतकर्‍यांनी आत्महत्या करु नये, यासाठी यमुनानगर येथील अपंग विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. या दिंडीला यावर्षी तीस वर्षे पूर्ण झाली. दिंडीत शाळेचे पंचवीस ते तीस विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी दुष्काळ हटू दे, समृध्दी नांदू दे अशा उत्साहपूर्ण घोषणा देत दिव्यांग व्यक्तीचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. अपंग व्यक्तींचा उत्साह वाढावा यासाठी ही दिंडी काढण्यात येत असल्याचे यावेळी विश्‍वनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दिंडीत नवनाथ वाघमोडे, कौशल्या हिवसरे, विवेक वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले.