होमपेज › Pune › स्वीय सहायकाची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल, पंकजा मुंडे यांची बदनामी

स्वीय सहायकाची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल, पंकजा मुंडे यांची बदनामी

Published On: Mar 01 2018 9:36PM | Last Updated: Mar 02 2018 1:32AMपुणे: प्रतिनिधी 

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाने पैशाची देवाणघेवाण केल्यासंबंधिची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. ही ऑडिओ क्लिप पूर्णतः बनावट असल्याचे समोर आले असून यातून पंकजाताई मुंडे यांना बदनामीचे षडयंत्र उघड झाले आहे. या प्रकरणी परळी पोलिसात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कथित ऑडीओ क्लिप प्रकरणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी अनोळखी  मोबाईल धारकाविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाला राजकीय वळण

दरम्यान सध्या विधी मंडळातील दलालीच्या संबंधाने होत असलेला आरोप व वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर अचानक पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाची बनावट ऑडीओ क्लिप व्हायरल होत असल्याने याला राजकीय वळण लागत असल्याचे बोलले जात आहे.

यामागे मोठे षडयंत्र

निव्वळ बनावट संवाद केलेली ही ऑॅडिओ क्लिप जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना कुलकर्णी यांनी यवतमाळ येथील संजय राठोड हा व्यक्ती कोण आहे हे आपणास माहीत नाही, त्याची कधी भेटही झाली नाही तसेच या क्लिपमधील आवाज माझा नाही असे म्हटले आहे. माझ्या नावाचा ऑडीओ क्लिपमध्ये जाणीवपूर्वक उल्लेख करत माझी व त्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. या बाबत आपण रितसर फिर्याद दाखल केली असून हे षडयंत्र करणाऱ्या लोकांवर सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी.