Sat, Jan 19, 2019 15:46होमपेज › Pune › कांद्याला १८०० चा भाव

कांद्याला १८०० चा भाव

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 1:52AMराजगुरुनगर : वार्ताहर

कांद्याच्या भावातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर किमान निर्यातमूल्य टनाला 700 डॉलरवरून शून्य करण्यात आले. या निर्णयानंतर कांद्याच्या बड्या निर्यातदार कंपन्यांनी कांदा मार्केटकडे धाव घेतली असली, तरी अद्यापपर्यंत कांद्याच्या भावात मागील पंधरवड्याप्रमाणे भरघोस वाढ झालेली नाही. सद्य:स्थितीत कांद्याच्या भावात क्विंटलला 400 ते 500 रुपयांनी वाढ झाली असून, कांद्याचे सरासरी भाव प्रतिक्विंटलला 1 हजार 800 रुपयांवर स्थिरावले आहेत. 

पंधरवड्यापूर्वी प्रतिक्विंटलला सरासरी 2 हजार 800 ते 3 हजार रुपयांवर असणारे भाव 1200 ते 1400 रुपयांपर्यंत गडगडले होते. आवक वाढल्याने आठवडाभरात हजार रुपयांनी गडगडलेले कांदाभाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी 700 डॉलर प्रतिटन असणारे किमान निर्यातमूल्य शून्यावर आणले. निर्यातमूल्य शून्यावर आल्याने चीन, पाकिस्तान, श्रीलंका या देशांबरोबर स्पर्धा करता येणार असून, कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होणार आहे. कांद्याची प्रत्यक्ष निर्यात सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात आणखी वाढ होईल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.   खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात बुधवारी (दि.7) चाकणला 45 हजार पिशव्या कांद्याची आवक होऊन प्रतिक्विंटलला 1 हजार 400 ते 2 हजार रुपये भाव मिळाला.