Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Pune › दुहेरी खून प्रकरण : चौथा आरोपी अटकेत

दुहेरी खून प्रकरण : चौथा आरोपी अटकेत

Published On: Jun 13 2018 11:07AM | Last Updated: Jun 13 2018 11:28AMवाकड : वार्ताहर 

हिंजवडीच्या खून प्रकरणात आरोपींकडून हिंजवडी पोलीसांची अजूनही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फरार असलेला चौथा साथीदार हा परप्रांतीय असल्याची कबुली देण्यात येत होती. मात्र हा एका अटक आरोपीचाच सख्खा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला सोलापुरातून अटक केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सावन नारायण जाधव (२५ रा. हिंजवडी. मूळ रा. सोलापूर) या फरार आरोपीला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. शनिवारी अश्विनी भोंडवे व अनुज भोंडवे या मायलेकरांचा गळा दाबून खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी अश्विनीचा पती दत्ता वसंत भोंडवे, त्याची प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे, प्रशांत जगन भोर ,पवन नारायण जाधव यांना करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील आणखी एक चौथा साथीदार फरार होता. 

दरम्यान, सावन जाधवला वाचवण्यासाठी अटक आरोपींकडून आपला चौथा साथीदार हा मूळचा पश्चिम बंगालचा नासिर उल असल्याचे सांगत होते. नासिरची माहिती घेत असताना आरोपी पुन्हा काहीतरी दिशाभुल करीत असल्याचा संशय पोलिसांना आला. एका आरोपीला विश्वासात घेत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने चौथा आरोपी हा अटक आरोपी पवनचा भाऊ सावन असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ सावनला याला रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातून अटक केली. त्याच्याकडे विचारणा केली असता तो देखील या प्रकरणात सहभागी असल्याची त्याने कबुली दिली.