Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Pune › पोलिसांवर पिस्तूल रोखणार्‍याला सराईताला अटक 

पोलिसांवर पिस्तूल रोखणार्‍याला सराईताला अटक 

Published On: Jul 04 2018 9:24PM | Last Updated: Jul 04 2018 9:24PMपुणे प्रतिनिधी 

मंडई परिसरात एकावर कोयत्याने वार करणारा सराईत येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावला. मात्र, पोलिसांची नजरानजर होताच पळणार्‍या सराईताचा पाठलाग करणार्‍या पोलिसांवरच त्याने थेट पिस्तूल रोखले आणि पुढे याल तर याद राखा अशी धमकी दिली. मात्र फरासखाना पोलिस ठाण्यातील जिगरबाज पोलिस कर्मचार्‍याने त्याला शिताफीने पकडले. या झटापटीत पोलिस कर्मचारी मात्र किरकोळ जखमी झाले आहे. 

रोहित दिलीप माने (लोहियानगर) असे अटक कऱण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 

फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि कर्मचारी गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून दस्त घालत होते. त्यावेळी 14 जून रोजी उंबर्‍या गणपती चौक बुधवार पेठ व मंडई येथे सुरज महादेव बनसोडे याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत रोहित माने हा गणेश पेठेतील पांगूळ आळी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार हर्षल शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तेथे सापळा रचला. रोहित माने तेथे आला. त्याची आणि पोलिसांची नजरानजर होताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. मात्र, थोड्या अंतरावर लगेच थांबला आणि कमरेला लावलेले पिस्तूल काढून त्याने थेट पोलिसांवरच रोखले. पुढे येऊ नका , पुढे आला तर याद राखा अशी धमकी दिली आणि पोलिसांचे काहीएक ऐकतच नव्हता. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी आम्ही पोलिस आहोत हत्यार खाली टाक आणि पुढे हजर हो असे सांगत असतानाच पोलिस नाईक दिनेश भांदुर्गे आणि पोलिस हवालदार योगेश जगताप यांनी त्याला पाठीमागून मिठी मारून जमीनीवर पाडले आणि त्याच्या हातातील पिस्तूल काढून घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आले आहेत. यावेळी झटापटीत पोलिस कर्मचारी दिनेश भांदुर्गे यांना किरकोळ मार लागला आहे. 

ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली,सहायक पोलिस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, तपास पथकाचे उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी हर्षल शिंदे, दिनेश भांदुर्गे, बापूसाहेब खुटवड,संदिप पाटील, विनायक शिंदे, योगेश जगताप, संजय गायकवाड, विशाल चौगूले, शंकर संपते, शंकर कुंभार, अमोल सरडे, अमेय रसाळ, विकास बोर्‍हाडे, महावीर वलटे यांच्या पथकाने केली.