Wed, May 22, 2019 14:27होमपेज › Pune › शंभरच्या बनावट नोटा छापणार्‍याला अटक

शंभरच्या बनावट नोटा छापणार्‍याला अटक

Published On: Jan 07 2018 2:10AM | Last Updated: Jan 07 2018 2:05AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरीस असणार्‍या आयटी इंजिनिअरने शंभर रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून चलनात आणल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समोर आणला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करीत शंभराच्या 54 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. हा आयटी इंजिनिअर मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून, तो मोठ्या पगावर नोकरी करत असल्याचे समोर आले आहे. 

उदय प्रताप वर्धन (वय 34, कलवड वस्ती, लोहगाव, मूळ. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) आणि त्याचा साथीदार संदीप वसंत नाफाडे (वय 34, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहरातील सराईत गुन्हेगार, तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. दरोडा प्रतिबंधक पथकातील कर्मचारी अजय थोरात यांना माहिती मिळाली, की धानोरी परिसरात एक व्यक्ती भारतीय चलनाच्या बनावट नोटा लोकांना देत आहे. त्यानुसार, पथकाने याठिकाणी सापळा रचून संदीप नाफाडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ शंभर रुपयांच्या नोटा मिळून आल्या.  त्याने या नोटा बनावट असल्याचे सांगितले. त्याच्याकडून 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्या वेळी उदय वर्धन याने या नोटा तयार केल्या आहेत. त्याच्याकडून घेऊन मी या नोटा चलनात आणत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी उदय वर्धन याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी प्रिंटर, लॅपटॉप, तसेच 4 हजार 500 रुपयांच्या शंभरच्या बनावट नोटा, असा एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विद्युलता चव्हाण, विनायक पवार, अजय थोरात, महेश कदम, यशवंत आब्रे यांच्या पथकाने केली. उदय वर्धन हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. गेल्या तीन वषार्र्ंपासून तो पुण्यात नोकरीस आहे. त्याचे लग्न झालेले असून, त्याला एक मुलगी आहे. तो पुण्यातील एका नामांकित कंपनीत महिना 50 हजार रुपये पगारावर नोकरीस आहे. तर, संदीप नाफाडे हा व्यवसायाने टेलर आहे. दोघेही एकाच परिसरात असल्याने त्यांची ओळख होती. उदय याच्या घरची परिस्थिती चांगली आहे. 

अन् सुरू केला छापखाना

एका दुकानात दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्यासाठी उदय वर्धन गेला होता. त्या वेळी त्याला सुट्टे पैसे मिळाल्यानंतर त्यामध्ये त्याला शंभर रुपयाची एक बनावट नोट मिळाली. त्यानंतर त्याला बनावट नोटा तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने 12 हजार रुपयांचे एक प्रिंटर विकत घेतले. त्यानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून त्याने नोटा छापण्यास सुरुवात केली. हुबेहूब शंभराच्या नोटा छापल्या. तसेच, नाफाडे याला या नोटा चलनात आण्यासाठी दिल्या. दरम्यान, या दोघांनी पन्नास रुपयांच्या नोटाही छापल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, पोलिसांना त्यांच्याकडून पन्नासच्या नोटा मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले.