Thu, Apr 25, 2019 03:41होमपेज › Pune › पुणे : वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारपर्यंत तेरा चेन स्नॅचिंगचे प्रकार 

पुणे : वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारपर्यंत तेरा चेन स्नॅचिंगचे प्रकार 

Published On: Jun 27 2018 3:51PM | Last Updated: Jun 27 2018 3:51PMपुणे : प्रतिनिधी 

वटपौर्णिमेच्या दिवशी सोनसाखळी चोरट्यांनी बुधवारी शहरात धुमाकूळ घातला. वड  पुजनासाठी घरातून दागिने परिधान करून निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याच्या तेरा घटना सकाळपासून शहरात घडल्या आहेत. मागील वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी १२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

वटपार्णिमेनिमित्त महिला वडाची पुजा करण्यासाठी घरातून पुजेचे ताट घेऊन दागिने परिधान करून घराबाहेर पडल्या. त्यावेळी दुचाकीवरून येणार्‍या चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पहिली घटना घडली़  पाठोपाठ शिवाजीनगर येथे  ८ वाजून २० मिनिटांनी दुसरी घटना घडली. त्यानंतर सांगवी येथे सकाळी पावणे नऊ नंतर दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीनंतर काही अंतरावरच  एकापाठोपाठ ४ घटना घडल्या. 

त्यानंतर भारती विद्यापीठ आणि चतु:श्रृंगी परिसरात प्रत्येकी २ आणि मार्केटयार्ड, कोंढवा, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. 

लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती दुचाकीचा क्रमांक लागला असून हे तरुण  इराणी आहेत. किमान दोन ते तीन टोळ्यांनी सोनसाखळी चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी काही ठिकाणी एका पाठोपाठ दागिने हिसकावून नेण्याच्या प्रकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.  मागील वर्षी अशाच प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी बारा घटना घडल्या होत्या.