Sun, Aug 25, 2019 07:57होमपेज › Pune › पोलिस अधीक्षकांनाच ‘दे धक्‍का’

पोलिस दलातील बेरक्याचा अधिक्षकांनाच दे धक्का

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:36AMपुणे : विजय मोरे 

ग्रामीण पोलिस दलाला नॉनकरप्ट आणि खमक्या पोलिस अधीक्षक मिळाला असला तरी ग्रामीण पोलिस दलातील बेरक्या आणि भ्रष्ट पोलिसांनी अधीक्षकांनाच ‘दे-धक्‍का’ देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधीक्षक सुवेझ हक यांच्याच नावाने मोबाईल नंबर ‘ट्रू कॉलर’वर नोंदवून  त्याच मोबाईल नंबरने शहर आणि जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांना व संशयित सिमीच्या दहशतवाद्यांना फोन करून प्रचंड पैसे उकळणार्‍या पोलिस शिपायाची कृष्णकृत्ये चव्हाट्यावर आली आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस दलात स्वतंत्र एटीएस शाखा आहे. पूर्वी एटीएस ही शाखा म्हणजे लाखोंची कमाई करणारी  म्हणून ओळखली जात होती. मात्र, पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस दलाला चाप बसला आहे.  त्यामुळे ग्रामीण एटीएसमधील कर्मचार्‍यांनाही आपल्या प्रवृत्तीला आवर घालावा लागला.

मात्र, ग्रामीण पोलिस दलातील पोलिसांना राज्यातील पोलिस दलात  ‘बेरके’ पोलिस म्हणून ओळखले जाते. येथील काही पोलिस शिपाई, हवालदारांनी तर कोटीची उड्डाणे घेतल्याचे वास्तव पाहावयास मिळते.  अनेक जण महागड्या कारमधून फिरताना दिसतात. त्यामुळे मुळातच भ्रष्ट असलेल्या या पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने पैशांवर हात मारण्यास सुरुवात केली. परंतु, एका पोलिस कर्मचार्‍याने यावर मात करून एकूणच भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा कळस गाठला. या कर्मचार्‍याने दस्तुरखुद्द सुवेझ हक यांच्याच नावाने मोबाईल नंबर स्क्रीनिंग करून त्याचा वापर करून अनेक अवैध धंदेवाल्यांकडून लाखोंची वसुली केली असल्याचे काही कर्मचार्‍यांनीच सांगितले.

या कर्मचार्‍याचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढल्यास अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी उघड येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात  पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्याशी संपर्क साधला व त्यांनाही या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाची  गांभीर्याने दखल घेत असल्याचे सांगितले. परंतु, जर  पोलिस अधीक्षकांच्या नावेच ‘ट्रु कॉलर’वर नंबर रजिस्टर केला जात असेल तर,  पुणे शहर  आणि जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि प्रधानसेवकाच्या नावेही कुणीही सहज नंबर ‘ट्रु कॉलरला रजिस्टर केला तर नवल नाही.