Sat, Aug 17, 2019 16:19होमपेज › Pune › पुणे पोलिस अतिजागृत : पवार

पुणे पोलिस अतिजागृत : पवार

Published On: Jun 26 2018 4:36PM | Last Updated: Jun 26 2018 4:57PMपुणे : प्रतिनिधी

मागील काही घटना पाहता पुणे पोलिस अतिजागृत झाल्याचे दिसत आहे. कायदा हातात घेऊन पोलिस काम कतर आहेत. कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी आत्ता आम्हाला लक्ष घालावे लागेल. हा गैरवापर थांबण्यासाठी आम्ही लवकरच धोरण ठरविणार्‍यांसोबत चर्चा करू, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारचे मागील चार वर्षातील अपयश लपविण्यासाठी भाजप नेत्यांना ४६ वर्षापूर्वीची आणीबाणी आठवत असल्याचा टोलाही पवार यांनी यावेळी भाजपला मारला. 

एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार मंगळवारी पुण्यात आले होते, त्यांवेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे यांना बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी अटक  केल्याच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘मागील काही घटना पाहता पुणे पोलिस अतिजागृत झाल्याचे दिसत आहे. ते अततायीपणे कारवाया करत असल्याचे दिसत आहे. बँकेच्या व्यावहारावर निर्णय घेण्याचा अधिकार रिझर्व बँकेला आहे. पोलिस कायदा हातात घेऊन काम करत आहेत. पोलिसांकडून होणारा कायद्याचा गैरवापर थांबण्यासाठी याबाबतचे धोरण ठरवणार्‍यांशी आम्ही लवकरच बोलू.’ 

भाजप नेत्यांकडून वारंवार आणीबाणीवर बोलले जात असल्याच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘भाजप सरकारला गेली चार वर्षात कोणत्याही क्षेत्रात यश मिळालेले नाही. चार वर्षात आलेले अपयश झाकण्यासाठी भाजप नेत्यांना आत्ता ४६ वर्षानंतर आणीबाणीची आठवण होत आहे.’ 

पवारांनी यावेळी राज्याच्या शैक्षणिक धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, शिक्षणाच्या संदर्भात सत्ताधार्‍यांकडून योग्य निर्णय घेतले जात नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराशी विसंगत असे धोरण शिक्षण क्षेत्रात राबविले जात आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचे काम विद्यार्थी संघटनांचे आहे. त्यांनी ते करावे आम्ही संबंधीत मंत्र्यांशी या विषयावर बोलण्यास तयार आहोत. शिक्षण व्याावसायातील संघर्ष योग्य नसल्याचे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले.