Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Pune › शंभरी ओलांडलेल्या शिवाजी पुलाकडे दुर्लक्ष

शंभरी ओलांडलेल्या शिवाजी पुलाकडे दुर्लक्ष

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:00AMपुणे :  देवेंद्र जैन 

पुणे शहरात सर्वात जास्त एकेरी रहदारी असलेला व शंभर वर्षांपेक्षा जास्त जुना असलेल्या शिवाजी पुलाकडे लक्ष देण्यास, अथवा जागा उपलब्ध असताना समांतर पूल बांधण्याकरिता महानगरपालिकेच्या प्रशासनाला अथवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला वेळ नसल्याचेच दिसते आहे. 

पुणे शहरातील ऐतिहासिक असा हा शिवाजी पूल शहराच्या उत्तर-पश्चिम भागातील नागरिकांना दक्षिण भागाशी जोडतो. तसेच शिवाजीनगर व स्वारगेट येथे येणार्‍या प्रवाशांना शहराच्या मध्यवस्तीत येण्याचा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. खूप वर्षांपूर्वी या पुलाला राष्ट्रीय महामार्ग 4 चा दर्जा होता. काळानुरूप जशी शहराची वाढ होत गेली, तसे वेगवेगळे रस्ते अस्तित्वात आले. पूर्वी या पुलाची ओळख नवा पुल म्हणून होती. काही दशके आधी नव्या पुलाचे शिवाजी पूल व शिवाजी रस्ता म्हणून नामकरण करण्यात आले. 

सदर पूल शंभर वर्षांपेक्षा जुना असल्यामुळे आता पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आला आहे. त्यामुळे या पुलाला पर्यायी पूल बांधणे गरजेचे आहे. सदर पुलाच्या शेजारी पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आहे व लाखो वाहने या पुलाचा रोज वापर करत असतात. सदर पुलाचा वापर एकेरी वाहतुकीकरिता असूनही रोजच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. या पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्याकरिता जागा उपलब्ध असताना आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा प्रशासनाने याकरिता प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल जाणकार करीत आहेत. नुकतीच कोल्हापूर येथे पंचगंगा शिवाजी पुलावर मोठी दुर्घटना घडली व 13 पुणेकरांना आपले प्राण गमवावे लागले; त्या पार्श्‍वभूमीवर हा विषय प्राधान्याने विचारात घेण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

सद्यःस्थितीत डेंगळे पुलाला समांतर पूल बांधण्याकरिता काम सुरू आहे; पण जिथे गरज आहे तिथे पूल व इतर विकासकामे न करण्याचे पुणे महानगरपालिकेचे धोरण असल्याची टीका होत असते. पुणे शहरात सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न हा वाहतुकीचा आहे. जहांगीर रुग्णालय ते अलंकार चित्रपटगृह येथील पुलाचे काम तर गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. अनेक सरकारे आली व गेली; पण पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती कोणीही दाखवू शकलेले नाही. त्यामुळे शिवाजी पुलावर मोठी दुर्घटना होण्याची महानगरपालिका व शासनकर्ते वाट पाहात आहेत का, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

शहरात जेवढे पूल आहेत त्यांच्या प्रत्येक कोपर्‍यात जर महानगरपालिकेने कमी खर्चात छोटे समांतर लोखंडी पूल बांधले तर वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. छोटे छोटे पूल बांधण्याकरिता जागा उपलब्ध असताना त्या जागांचा वापर होत नाही. छोट्या कोपरा पुलांकरिता खर्च कमी लागत असताना त्यावर कोणीच बोलायला तयार नाही.