Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Pune › रातराणी बसमध्ये तपासणी पथकांची संख्या वाढविली

रातराणी बसमध्ये तपासणी पथकांची संख्या वाढविली

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:58AMपुणे :प्रतिनिधी 

शहरातील सहा मार्गावर सुरू असलेल्या ‘रातराणी’ बसमध्ये पीएमपी प्रशासनाने तिकीट तपासणी पथकांची संख्या वाढविली असून, त्यांच्या वेळामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली आहे. तसेच वाहक आणि चालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे.

‘पीएमपीच्या रातराणी बसने प्रवास करणे धोकादायक’ या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ ने रविवारी विशेष पहाणी करून माहिती घेतली असता, जवळजवळ सर्वच मार्गावर काही प्रमाणात धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून आले. काही प्रवासी मद्यधुंद, तर बहुतांशी बसथांब्यावर वेळेत बस येत नसल्याचे उघडकीस आले. महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर पुरुषमंडळी बिनदिक्कत बसले होते. मात्र, त्यांना वाहकाने हटकले नाही. चालक आणि वाहकांनाही सुरक्षितता नसल्याचे दिसून आले. हा सगळा वृत्तांत छापून आल्यानंतर पीएमपी प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी तातडीने हालचाली केल्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

या बाबत पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने म्हणाले, पूर्वी  रातराणी बस मध्ये तिकीट तपासणी पथक कार्यरत होतेच, मात्र त्याची संख्या कमी होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. रातराणीसाठी एक पथक कार्यरत असून, त्यामध्ये तीन तिकीट तपासनीस आहेत. पूर्वी या तिकीट तपासनीसांच्या कामाची वेळ रात्री बारा ते एक अशी होती. आता त्यांच्या कामाच्या वेळा पहाटेपर्यत करण्यात आलेल्या आहेत. 

चालक आणि वाहक यांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीच्या स्वारगेट येथील मध्यवर्ती कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. ती आता अधिक सक्षम करण्यात आली आहे. चालक अथवा वाहकांनी काही अडचण आल्यास, त्यांनी या विभागाशी संपर्क साधल्यास त्यांना तात्काळ सहकार्य करण्यात येते. तसेच वाहक अथवा चालक यांना काही धोका वाटत असल्यास ते बस पोलिस ठाण्यात नेऊ शकतात, तसेच मध्यवर्ती कार्यालयातूनही पोलिसांशी संपर्क साधला जाऊ शकतो. आता रातराणी बसचा प्रवास अधिक सुरक्षित कसा होईल यावर लक्ष देण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.