Sat, Jul 20, 2019 10:51होमपेज › Pune › भाजपात आता लांडगे- सावळे युती?

भाजपात आता लांडगे- सावळे युती?

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 12:20AMपिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर

महापालिकेत  समाविष्ट गावांतील 425 कोटींच्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून भाजपात खा. अमर साबळे व स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात वाद पेटला असतानाच, भोसरीचे आ. महेश लांडगे यांनी सावळे यांना ‘क्लीन चिट’ देत त्यांची पाठराखण केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या राजकारणात आ. लांडगे व सावळे, सारंग कामतेकर युतीचीच चर्चा आहे. 

सीमा सावळे या भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक मानल्या जातात. आ. जगताप व आ. लांडगे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. दोघेही मंत्रिपदाचे दावेदार असल्याने हा संघर्ष अधिकच गडद झाला आहे. दुसरीकडे पालिकेत समाविष्ट गावांतील 425 कोटींंच्या कामामुळे आ. लांडगे आणि आ. जगताप समर्थक सीमा सावळे यांच्यातील संबंध सुधारल्याचे दिसत आहे. सावळे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा शहरात असतानाही पालिकेत न फिरकलेले आ. लांडगे सीमा सावळे यांची पाठराखण  करू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या समाविष्ट गावांतील पहिल्या टप्प्यातील 90 कोटींच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लांडगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीविरोधात जोरदार फटकेबाजी केली. भोसरी विधानसभा मतदारसंघात ज्यांना स्वपक्षाचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, तेच विकासाला विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी शिवसेना खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता केली. समाविष्ट गावांकडे 20 वर्षे कोणी लक्ष दिले नाही. विषय अडवून धरले, असा आरोप करत राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. महापालिका निवडणुकीमुळे गेल्या वर्षी अर्थसंकल्पाला व कामांनाही विलंब झाला. त्यावेळी कामे होत नाहीत म्हणून ओरडणारी  मंडळी आता कामे सुरू केली, तर भ्रष्टाचार झाला म्हणून ओरडत आहेत; परंतु आम्ही कोणत्याही टीकेला घाबरत नाही, हे सांगतानाच लांडगे यांनी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.  

विरोधकांनी सावळे यांची  धास्ती घेतली आहे. सावळे, सारंग कामतेकर यांनी यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार पुराव्यांसह बाहेर काढला होता, त्यामुळेच त्या वेळी पोळलेले सावळे यांच्यावर खोटे आरोप करत आहेत; परंतु आम्ही सारे सावळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. खोटे आरोप करणार्‍यांवर कितपत विश्‍वास ठेवायचा हे जनतेनेच ठरवावे, असे आवाहन त्यांनी केले.  लांडगे आपल्या मतदारसंघात 425 कोटींची कामे होणार असल्याने चांगलेच प्रभावित झाले आहेत, त्यामुळे त्यांनी सावळे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली खरी; पण त्यामुळे भाजपात लांडगे व  सावळे यांच्या युतीची, बदललेल्या समीकरणांची जोरदार चर्चा आहे.

भाजपा शहराध्यक्षांचे मौन

समाविष्ट गावांतील 425 कोटींच्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादीने केला. त्यापाठोपाठ खुद्द भाजपा खा. अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले;  मात्र या प्रकरणी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी अजूनही मौन बाळगल्याने त्याची चर्चा आहे.