Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Pune › नवीन मालमत्ता खरेदीत आता ‘आधार’च ‘साक्षीदार’

नवीन मालमत्ता खरेदीत आता ‘आधार’च ‘साक्षीदार’

Published On: Jan 31 2018 2:18AM | Last Updated: Jan 31 2018 2:15AMपुणे : दिगंबर दराडे

नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी आता दोन साक्षीदारांची गरज लागणार नाही. दोन साक्षीदार न घेता, फेब्रुवारी अखेरपासून नवीन मालमत्ता रजिस्टर करता येणार आहे. याकरिता आधार क्रमांकाची नोंदणी करावी लागणार असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरू केल्या आहेत. 

मालमत्ता  खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. प्लॉट, फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी सोबत दोन साक्षीदार आणावे लागत असत. फेब्रुवारीपासून ही अट रद्द करण्यात येणार आहे. त्याऐवजी खरेदी-विक्री करणार्‍यांचे आधार कार्ड आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे साक्षीदार आवश्यक राहणार नाही. 

 मुद्रांक शुल्क विभागात राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या ऑनलाइन सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारला महसुलात किती फायदा होतो, यापेक्षा नागरिकांना त्याचा किती चांगला फायदा होतो, यावर भर देण्यात येत आहे. ई-सुविधांद्वारे नोंदणी कार्यालयातील नोंदणीच्या पद्धतीत सुलभता आणता येणार आहे. मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना कमीत कमी वेळ कार्यालयात लागेल, अशी यंत्रणा राबविण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘पुढारी’शी बोलताना दिली.  

आधार क्रमांक व अंगठा (थम्ब इम्प्रेशन) जुळल्याशिवाय खरेदी-विक्री दस्ताची नोंदणीच होणार नाही, अशी यंत्रणा त्यासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जमाबंदी आयुक्त व महसूल विभाग यासंबंधी लवकरच चर्चा करून सातबारा उतार्‍यावर आधार क्रमांकाची नोंद कशी घेता येईल याचा विचार करीत आहेत.

 बनावट सातबारा उतार्‍याद्वारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविले जात आहेत. सातबारा उतार्‍यावर संबंधित व्यक्तीची कोणतीही ओळख सद्य:स्थितीत नाही. त्यामुळे या व्यवहारांमधील सत्यता पडताळणे कठीण होते. जमाबंदी आयुक्तांकडे सातबारा बदलण्यासंदर्भात काम सुरू आहे. जमीन मोजणीनंतर येणारा नवा सातबारा हा संबंधित जमिनीचे छायाचित्र, चारही दिशांचे सर्व्हे क्रमांक, जमिनीचे नेमके क्षेत्र याची माहिती देणारा असणार आहे. त्यात जमीन मालकांच्या नावाबरोबरच आधार क्रमांक नोंदविल्यास मूळमालकांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. 

व्यवहारातील गडबडी कमी होतील

या निर्णयामुळे खरेदी-विक्रीतील गडबडी कमी होण्यास निश्‍चितपणे फायदा होणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीला आल्यावर मूळमालकांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. आधार नंबर व थम्ब इप्रेशन जुळले नाही, तर व्यवहारातील गडबड लक्षात येऊ शकते. त्यामुळे बोगस व्यवहार आधारमुळे रोखले जातील.
-  सुहास लोणकर 
(सामाजिक कार्यकर्ते)

शासनाने हा निर्णय चांगला घेतला आहे. या निर्णयामुळे चुकीचे व्यवहार रोखण्यास निश्‍चितपणे मदत होईल. यामुळे पारदर्शकता येईल. अनेक वेळा साक्षीदार शोधावे लागतात. ही देखील कटकट कमी होईल. आधार क्रमांक देणे सगळ्यांना सोयीचे होईल.
- महेश राठी, बांधकाम व्यावसायिक