Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Pune › शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाइन’

शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाइन’

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 2:00AMपुणे : प्रतिनिधी

शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये 12 जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे शालार्थ प्रणाली बंद पडली आहे. शालार्थ प्रणाली दुरुस्त करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्या ही प्रणाली सुरू करणे शक्यच नाही. याचसाठी राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑफलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेश राज्याच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांना दिले आहेत. त्याला अनुसरून माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना शिक्षकांचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत.

राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगाराची बिले दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात वेतन पथक अधीक्षक कार्यालयमार्फत स्वीकारली जातात. यासाठी संबंधित शाळांना तारखाही नेमून दिल्या आहेत. या महिन्यात मात्र ज्या शालार्थ वेतन प्रणालीमधून वेतन देयके अपडेट केली जातात त्या शालार्थ वेतन प्रणालीचे संकेतस्थळच बंद असल्यामुळे शिक्षकांच्या वेतन देयकामध्ये अडचणी येत होत्या. 

शिक्षकांचे सर्व अर्थिक व्यवहार हे पगारावरच अवलंबून असून शिक्षकांना कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी शालार्थ वेतन प्रणालीची सेवा तात्काळ सुरु करण्यात यावी किंवा या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास ती दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी शासनाकडे केली होती.

शालार्थ प्रणालीवरून तब्बल 5 लाख 70 हजार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइन काढण्यात येतात. त्यामुळे प्रणाली बंद झाल्याचा फटका या सर्वच कर्मचार्‍यांना बसण्याची शक्यता होती. याचसाठी चारूशिला चौधरी यांनी ज्या शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे पगार शालार्थमधून दिले आहेत. त्या शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार डिसेंबर महिन्याच्या वेतनाच्या आधारे देण्यात यावेत, ज्या कर्मचार्‍यांनी डिसेंबर महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे; तसेच सेवानिवृत्त झाले आहेत किंवा अन्य कारणांमुळे सेवेतच नाहीत, अशा कर्मचार्‍यांची नावे जानेवारी महिन्याच्या वेतन देयकातून वगळावी, डिसेंबर महिन्याच्या वेतन देयकानुसार वेतन भत्ते परिगणित करून वेतन देयक सादर करावे अशा प्रकारच्या सूचना प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांना गुरुवारी दिल्या होत्या. 

त्या अनुषंगाने माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी वेतन अधीक्षक तसेच संबंधित अधिकार्‍यांना शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.