Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Pune › घरातही सुरू करता येणार मधमाशी पालन

घरातही सुरू करता येणार मधमाशी पालन

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

ग्रामीण भागात सर्रास दिसणारे मधमाशांचे पोळे शहरी भागात अभावानेच आढळते. शहरात अनेकदा मधमाशा दिसल्या की नागरिक घाबरून जातात; मात्र ‘बी बास्केट’ या संस्थेने मधमाशी पालनाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हा व्यवसाय करता यावा यासाठी संस्थेने उत्तम औषधी मध देणार्‍या ‘ट्रायगोना’ मधमाशांचा पर्याय निवडला आहे.

शहरात मधमाशांचे पोळे दिसले की अनेकजण पोळे जाळतात किंवा त्यावर औषध फवारणी केली जाते; मात्र मधासाठी शहरी लोकांची मागणी अधिक आहे. विविध कंपन्यांचे मध लोक आवडीने खातात. यासाठी मधमाशांचे संरक्षण व संवर्धन करणार्‍या ‘बी बास्केट’ संस्थेची प्रिया फुलंब्रीकर, अमित गोडसे, तुषार सरोदे यांची टीम प्रयत्नशील असते. 

ट्रायगोना मधमाशा निसर्ग चक्रात परागीभवनाची महत्त्वाची  भूमिका  बजावतात. या माशा जैवविविधेचेही संवर्धन करतात.  ट्रायगोना माशा या आकाराने लहान असतात व चावल्या तर दुखत नाही आणि त्यांचा काटाही शरीरात जात नाही. त्यांच्या छोट्याशा पोळ्यातून 150 ते 200 ग्रॅम मध वर्षभरात जमा होतो. हा मध औषधी असून आरोग्यासाठी उत्तम असतो, असे गोडसे यांनी सांगितले. आत्तापर्यंत केरळ राज्यात लोकप्रिय असलेले ट्रायगोना मधमाशी पालन पुण्यात सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सोसायट्यांमधील नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
दरम्यान, संस्थेतर्फे इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रामध्ये या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी गेल्या काही वर्षात शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या वेगाने घटत आहे. शहरातील झाडे, बागांमध्ये कीटकनाशकांचा वापर अपवादाने असल्याने मधमाशांसाठी मानवी वस्ती उत्तम अधिवास ठरतो. परिणामी सोसायट्यांच्या बागांजवळ त्यांच्या पोळी बघायला मिळतात. या अशा पोळांचे पुनर्वसन करण्याचे काम बी बास्केट कशी करते याबद्दल माहिती देण्यात आली; तसेच ट्रायगोना माशीची निसर्ग संवर्धनासाठी होणारा उपयोग आणि मधमाशीपालन करण्याची शास्त्रीय पद्धत प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आले.