Tue, Mar 19, 2019 09:17होमपेज › Pune › पावसामुळे रस्त्यांची चाळण

पावसामुळे रस्त्यांची चाळण

Published On: Jun 27 2018 1:56AM | Last Updated: Jun 26 2018 11:43PMपिंपरी : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून  शहरात पडत असलेल्या पावसामुळे  विविध भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता बुजवण्यासाठी वापरण्यात आलेली खडी वाहून रस्त्यावर आली आहे. या खडीवरुन अनेक वाहने घसरुन पडल्याच्या घटना रोजच विविध भागात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी , अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

लोकमान्य हॉस्पिटलरोड चिंचवड, एल्प्रो कंपनी चौक , चिंचवड एमआयडीसी. बर्ड व्हॅली उद्यानासमोरील रस्ता, संभाजी चौक प्राधिकरण, भोंडवे कॉर्नर चौक, रावेत वाल्हेकरवाडी रोड, वाल्हेकरवाडी चौक, पवनानगर थेरगाव, वाल्मिकिनगर चौक भाटनगर, पिंपरी मेन बाजारपेठ यांसह शहरातील विविध भागातील रस्ते पावसामुळे उखडले असून रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक भागात वाहनधारकांचे किरकोळ अपघात झाले आहेत. पावसापुर्वीच अनेक भागात केवळ रस्ता दुरुस्तीचा दिखावा करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाली. अनेक रस्ते पावसामुळे खड्डेमय व जलमय झाले आहेत.  यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

महापालिकेने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा केला होता. परंतु, पहिल्याच पावसात हा दावा फोल ठरला आहे. निकृष्ट रस्त्याच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. याबाबत अद्याप गंभीर दखल घेण्यात आली नसून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली ऩाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात वाहतुकीचाही बोजवारा उडत आहे. या खड्डयांचा त्रास बसचालकांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.