होमपेज › Pune › मूल्यांकन न करणाऱ्या शाळा होणार बंद : जावडेकर

मूल्यांकन न करणाऱ्या शाळा होणार बंद : जावडेकर

Published On: Jan 19 2018 2:00PM | Last Updated: Jan 19 2018 2:00PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील शाळांमध्ये आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव आहे. शाळांची गुणवत्ता सुधारणे गरजेचे असल्याने ज्या पद्धतीने कॉलेजचे मूल्यांकन केले जाते, तसेच मूल्यांकन शाळांचे देखील केले जाणार आहे. ज्या शाळा गुणवत्तेवर खऱ्या उतरणार नाहीत, त्या भविष्यात बंद केल्या जाणार असल्याचा स्पष्ट इशारा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आठव्या छात्र संसद परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जावडेकर बोलत होते. 

महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी नॅशनल असेसमेंट ॲण्‍ड ॲक्रिडेशन कौंसिल (नॅक) ही संस्‍था आहे. या संस्‍थेमार्फत महाविद्यालयांची गुणवत्ता तपासून मानांकन दिले जाते. त्याच धर्तीवर शाळांचेही मूल्यांकन करण्यात येणार आहे. हे मूल्यांकन करून घेणे प्रत्येक शाळेला अनिवार्य असणार आहे. तसेच मूल्यांकनात जा शाळा खर्‍या उतरणार नाहीत, त्या बंद करण्यात येतील, असेही जावडेकर यांनी सांगितले.