Mon, Jul 22, 2019 03:43होमपेज › Pune › बचत गट पुन्हा वार्‍यावर; हाताला नाही काम  

बचत गट पुन्हा वार्‍यावर; हाताला नाही काम  

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 12:18AMनेहरूनगर : बापू जगदाळे

शहरातील हजारो महिला बचत गट पुन्हा एकदा रोजगाराअभावी पडून असून, महिलांचा बचत गटावरील विश्‍वास मावळत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे बाहुले बनलेले अनेक बचत गट ठोस धोरणांच्या अभावामुळे अखेरच्या घटका मोजत असल्याची स्थिती शहरात निर्माण झाली आहे. यासाठी नियोजनबध्द कृती आराखड्याची गरज आहे. अन्यथा महिला सबलीकरण हे केवळ राजकीय स्टंट ठरेल यात शंकाच नाही.

महिलांच्या विकासाचे व उन्नतीचे हक्काचे व्यासपीठ म्हणून महिला बचत गटाकडे पाहिले जाते. तसा प्रचार व वातावरण निर्मितीदेखील सरकारकडून केली गेली. त्यामुळे राज्याबरोबरच शहरातही अनेक बचत गट तयार झाले. काही वर्षामध्येच ही महिला चळवळ झपाट्याने सर्वत्र पसरली. याचा फायदा काही चाणक्ष राजकीय मंडळींनी करून घेतला व नंतर तोच कित्ता इतरही राजकीय मंडळींनी गिरवायला सुरवात केली आणि येथेच बचत गटाची दिशा भरकटली.  हे बचत गट राजकीय नेत्यांचेच बाहुले बनले.

आपल्या स्वार्थासाठी बचतगट स्थापन करायचे व आपल्याच कार्यक्रमाला गर्दी म्हणून त्यांचा वापर करायचा हा नवीन पायंडा सुरू झाला. जर बचत गटांना काम मिळाले तर ते पूर्णपणे स्वावलंबी होऊन आपल्या कक्षेबाहेर जातील ही भीती प्रत्येक राजकारण्यांना असल्यामुळे बचत गटाकडे सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे काही बचत गटातील महिला पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेने देखील महिला बचतगटांना तटपुंज्या अनुदानापुरतेच मर्यादित ठेवून त्यांना सबलीकरणापासून दूरच ठेवले आहे. काही राजकीय पुढारीही उदात्त भावनेने या बचत गटांना सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; परंतु तिथे बचत गटाचा निरुत्साह कारणीभूत ठरत आहे. यामुळे शहरातील महाबचत गटाच्या माध्यमातून उभे केलेले कोट्यवधीचे प्रकल्प बंद आहेत.  हा प्रकार महिलांच्या विकासास मारक ठरला असून अनेक गरजू महिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पवना थडीला बचत गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. या जत्रेतील स्टॉल मिळण्यासाठी अनेक बचत गटाकडून मोठी फिल्डींग लावली जाते.  पवना थडी जत्रेचे महत्व अधोरेखित होत असतानाही असा कार्यक्रम पालिकेकडून वर्षातून एकदाच केला जातो. वर्षभर गटाला काम नसल्यामुळे काही बचत गट नावालाच उरले असून काही बचत गट सावकारीसारख्या प्रकाराकडे वळले आहेत.  खर्‍या अर्थाने महिलांच्या विकासाची चळवळ ठरू पाहणारी बचत गटाची ही मोहीम नियोजनाअभावी दिशाहीन होत आहे. त्यामुळे वेळीच ठोस पावले  उचलणे गरजेचे आहे.

शासनाकडून नेहमीच बचत गटासाठी सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळेल म्हणून सांगितले जाते, परंतु त्याप्रकारचे कर्ज गरजू बचत गटाला अद्यापही मिळाले नाही. बँकेकडे याबाबत बचत गटांनी विचारणा केली असल्यास भली मोठी कागदपत्रांची यादी सांगितली जाते, जी बचत गट कधीही पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे बचत गटांना सहा टक्के दर कर्जाची सरकारची घोषणा फसवी वाटू लागली आहे. यासाठी राज्य सरकारने अर्थपुरवठा करणार्‍या संस्था व बचत गट यात समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचा समन्वय साधला गेला तरच महिलांच्या सबलीकरणाचा मार्ग मोकळा होईल व खर्‍या अर्थाने बचत गटांच्या विकासाला चालना मिळेल.
    - छाया सोळंके, महिला सामाजिक कार्यकर्त्या