Fri, Nov 16, 2018 13:41



होमपेज › Pune › पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Apr 22 2018 2:58PM | Last Updated: Apr 22 2018 2:58PM



जंक्शन : वार्ताहर 

जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा.बेलवाडी ता.इंदापूर जि.पुणे ) यांनी विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

वालचंदनगर पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परीसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवार(ता.२१) रोजी लासुर्णे येथील दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी  रात्रभर शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. आज रविवार (ता.२२) रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदार वस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा आढळून आला. 

वालचंदनगर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्या आढळल्या. यामध्ये गेल्या दोन वर्षापासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याने कर्जबाजारीपणाला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले, महेंद्र फणसे तपास करत आहेत. 

मंत्रायावर गुन्हे दाखल करण्याची मागणी...
नीरा डाव्या कालव्यातुन गेल्या वर्षी व य वर्षी उन्हाळी हंगामचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अॅड.हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी शेतीसाठी पाणी प्रश्नावरून सरकारच्या विरोधात आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.
 

Tags : no water supply, farming, farmer suicide