Wed, Mar 27, 2019 02:18होमपेज › Pune › धोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही 

धोकादायक इमारतींचा सर्व्हेच नाही 

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील पेठांमध्ये असलेल्या धोकादायक वाड्यांची माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे, मात्र शहराच्या उपनगरामधील ओढे आणि नाल्यालगत बांधलेल्या धोकादायक इमारतींची माहितीच पालिका प्रशासनाकडे नसल्याचे समोर आले आहे. धोकादायक इमारतींचा अद्याप सर्व्हेच करण्यात आला नसून हे काम एखाद्या एजन्सीमार्फत करावे लागणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान प्रशासनाकडे फक्त अनधिकृत बांधकामांची माहिती असून अशा बांधकामांना नोटीसा बजावण्याचे केले जात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

शहरातील व उपनगरातील अनेक ओढे आणि नाल्यांची रुंदी कमी करून, खड्ड्यांमध्ये भराव टाकून इमारती बांधण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी ओढ्यावर स्लॉब टाकून त्यावर इमारत बांधल्या आहेत. मध्यवर्ती शहरापेक्षा उपनगरांमध्ये हे प्रमाण मोठे आहे. प्रशासनातील अधिकारी अणि बांधकाम व्यावसायिक यांची मिलीभगत आणि संगणमत यामुळे असा धोकादायक बांधकामांचे प्रमान वाढले आहे. उपनगरांमधील बहुतेक ओढे आणि नाले बुजवून त्यावर पाच-सहा मजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. या पैकी बहुतांशी इमारती या अनधिकृत स्वरुपाच्या आहेत. अधिकार्‍यांना मलिदा मिळत असल्यामुळे या इमारतींवर कारवाई केली जात नाही. 

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या 11 गावांमध्येही मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे झालेली आहेत. या गावांमध्येतर मोकळी जागाच पहायला मिळत नाही. संपूर्ण ओढे, नाले अरुंद व निमुळते झालेले आहे. पावसाच्या पाण्याला वाट मिळत नसल्याने ते घरांमध्ये घुसल्याचे आणि ओढे नाल्यातील पाण्यामुळे पाया खचल्याने इमारती कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे अशा इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण होत असताना महापालिका प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे वारंवार समोर येत आहे.

केशवनगर, मुंढवा येथील ओढ्याच्या बाजूला असलेली एक दुमजली इमारत पडल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआकराच्या सुमार घडली. या पार्श्‍वभूमीवर शहर व उपनगरातील ओढे-नाल्या लगतलच्या धोकादायक इमारतींची नोंद महापालिकेकडे आहे का, हे दैनिक ‘पुढारी’ने पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशी नोंदच पालिका प्रशासनाकडे नसल्याचे समोर आले. या बाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तरे देताना पालिका अधिकार्‍यांकडून वारंवार पेठांमधील धाकादायक वाड्यांचीच माहिती दिली जात होती. उपनगरांमधील ओढे, नाले, टेकड्यांवरील धोकादायक इमारतींबद्दल कसलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने वाड्याशिवाय इतर धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. पालिकेच्या बांधकाम खात्याकडेही धोकादायक इमारतींची वेगळी अशी नोंद नाही. या विभागाकडे फक्त अनधिकृत इमारतींचीच माहिती आहे. 

शहरातील 276 वाड्यांवर कारवाई

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या 17 पेठांमध्ये जवळपास 7 हजार वाडे आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त वाड्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. दरवर्षि पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाकडू पाहणी करून धोकादायक वाड्यांना नोटीसा देऊन कारवाई करण्याचे काम केले जाते. यंदा शहरातील 286 धाकादायक वाड्यांपैकी 276 वाड्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत 10 वाड्यांसंबंधी प्रकरणे न्यायालयात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. यापुढेही वाड्यांची पाहणी करून नोटीस देण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

इमातचींच्या साहित्याचे परीक्षणच नाही

इमातच बांधण्यापूर्वी त्यासाठी वापरल्या जाणार्‍या सिमेंट, वाळी, दगड, विठा, माती, लोखंड यांचे प्रयोग शाळेत परीक्षण केल्यानंतर इमारत किती वर्षे वापरण्यास योग्य आहे हे निश्‍चित केले जाते. यासंबंधीचे परीक्षण करून घेणे बंधनकारक असताना बहुतेक विल्डरांकडून साहित्याचे परीक्षण करून घेतले जात नाही. उपलब्ध होऊल ते साहित्य वापरून इमारत बांधून नगरिकांना सदनिका विकल्या जातात. शासकीय कामासाठीही ठेकेदारांकडून साहित्याचे परीक्षण न करता अनेकवेळी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. बाधकाम परवाना देताना आणि काम पूर्णत्त्वाचा दाखला देताना या गोष्टी तपासणे गरजेचे असताना याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केली जात असल्याचे चित्र आहे.