Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Pune › तटबंदीअभावी बोपदेव घाट वाहनचालकांसाठी जीवघेणा

तटबंदीअभावी बोपदेव घाट वाहनचालकांसाठी जीवघेणा

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Jul 31 2018 11:55PMकोंढवा : सुरेश मोरे

सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील दरीखोर्‍यातून नागमोडी वळण घेत पुरंदरच्या दिशेने जाणारा मनमोहक बोपदेव घाट पाहताना अनेकांना त्याचा हेवा वाटतो. मात्र, त्याच घाटातून उतरताना अनेकांचा थरकाप उडतो. अतिशय तीव्र उताराची वळणे घेताना चांगल्या चालकालाही घाम फुटेल असा हा घाट असून, याच्या रुंदीकरणाबरोबरच संरक्षण कठड्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अनेक अपघात या घाटात घडूनदेखील त्याच्या डागडुजीकडे लक्ष देण्यासाठी बांधकाम विभागाला वेळ मिळत नाही. प्रशासनाकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

येवलेवाडी गावाच्या वेशीपासून बोपदेव घाटाला सुरुवात होते. जवळपास 3 ते 4 किलो मीटर अंतराचा हा घाट आहे. कात्रज, दिवेघाटां पेक्षाही अति तीव्र वळणाचा व उताराचा हा घाट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यावरून घाटातून नागरिक ये-जा करत होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यावर डांबर टाकले व कमी उंचीची सुरक्षा भिंत उभी केली असून, या भिंतीपासून वाहनांची कोणतीही सुरक्षा होत नाही.

अनेक अपघात या घाटात झाले आहेत. अनेक वाहने उंचीवरून खोल दरीत कोसळली असून, अनेक लोकांना कायमचे अपगंत्व आले तर काहींचे प्राण गेले आहेत. या घाटातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कानिफनाथ, नारायणपूर, केतकावळे, सासवड, जेजूरी, मोरगाव या देवस्थानाकडे दर्शनासाठी जाणारे लाखो भक्त मंडळी या घाटातून जात असतात. पुरंदराच्या पायथ्यापासून अनेक लोक शहरात दूध व्यवसायासाठी व शेतमाल विकण्यासाठी या घाटातून दुचाकीवरून व चारचाकी वाहनातून ये-जा करतात. वाहतुकीच्या दृष्टीने हा घाट खूप महत्वाचा मानला जातो. मात्र याची तातडीने डागडूजी व सुरक्षा भिंत तटबंदीचे काम होणे गरजेचे आहे. अन्यथा आंबेनळी घाटात बस कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी एखादा अपघात झाल्यास मोठी जिवित व वित्तहानी होवू शकते. यासाठी प्रशासनाने या घाटाकडे गांभिर्याने पाहायला हवे.

बांधकाम व्यावसायिकांचा राडारोडा व  कचरा घाटात

बोपदेव घाटातील रस्त्याच्या कडेने शहरातून टेम्पो, ट्रक  व ट्रॅकटरच्या सहाय्याने बांधकामाचा राडारोडा व अन्य कचरा आणून टाकतात. त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. फरशांचे तुकडे काचा व अन्य कचरा येथील रस्त्याच्या बाजूने टाकला जात आहे. यामुळे घाट आणखी असुरक्षित झालेला असून, घाटाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. आगामी काळात अशा गाड्या घाटात सापडल्या तर प्रशासनाकडे तक्रार करणार नाही. त्यांच्यावर गाव कडक कारवाई करेल अशी भूमिका येवलेवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

घाटाची रुंदी व तटबंदी करण्याची मागणी

बोपदेव घाटात या अगोदर झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही अनेकवेळा प्रशासनाला घाटाच्या सुरक्षितते बदल बोलो आहे. मात्र त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. या घाटाची रूंद्दी व तटबंदी महत्वाची आहे. या घाटातील दोन वळणे अतिशय धोकादायक आहेत. येथील तटबंदी करणे गरजेचे आहे. शासनाने लवकरात लवकर या घाटाचे काम व दुरूस्ती करायला हवी, अशी मागणी माजी जि. प. सदस्य दशरथ काळभोर यांनी केली आहे.