Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Pune › प्राणी गणनेत बिबट्यांची नोंदच नाही

प्राणी गणनेत बिबट्यांची नोंदच नाही

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:09AMपुणे : सुनील जगताप

शासनाच्या निर्देशाप्रमाणे वन परिक्षेत्रात दरवर्षी केल्या जाणार्‍या वन्य प्राण्यांच्या गणनेमध्ये पुणे जिल्ह्यातील प्राण्यांच्या नोंदी झाल्या खर्‍या, मात्र या गणनेत बिबट्यांचीच नोंद नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील प्राण्यांची गणना दरवर्षी केली जाते. हे निरीक्षण बौध्द पौर्णिमेच्या दिवशी वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांच्या ठिकाणी होत असते. वन विभागाच्या उपवनसंरक्षण कार्यायालयाच्या वतीने जून महिन्यातच ताम्हिणी, दौंड, बारामती, पुणे, वडगाव, इंदापूर, शिरोता या वन परिक्षेत्रामधील निवे, देऊळगाव गाडा, खुटबाव, कासुर्डी, राहू, टाकळी भिमा, जिरेगाव, पांढरेवाडी, रावणगाव, लोणारवाडी, गाडीखेल, कात्रज, लोणी काळभोर, लोहगड, आतवण, चावसर, देवले, गागरगाव, पोंदकलवाडी, म्हसोबाची वाडी, कळस, शेळगाव, कडबनवाडी, गोखळी, तरंगवाडी, डाळज, काळेवाडी, शिरोता डॅम, उदेवाडी, ठोकळवाडी, आंध्रलेख, सटवाईवाडी, ठोकळवाडी, नाणे आणि उकसान डॅम या पाठवठ्यांच्या ठिकाणी वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले. 

या केलेल्या निरीक्षणामध्ये ताम्हिणी वन परिक्षेत्रात भेकर, रानडुक्‍कर, ससा, रानकोंबडी, सांबर यांची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे दौंडमध्ये चिंकारा, ससा, खोकड, साळींदर, घोरपड, सायाळ, मोर, रानमांजर, लांडगा, कोल्हा या प्राण्यांचे दर्शन झाल्याची नोंद आहे. बारामतीमध्ये चिंकारा, कोल्हा आणि खोकड, पुण्यामध्ये रानडुक्‍कर, भेकड, माकड, मोर, सायाळ, वडगावमध्ये उदमांजर, ससा, रानडुक्‍कर, इंदापूरमध्ये प्रामुख्याने फक्‍त चिंकारा आणि ससा तर शिरोता वन परिक्षेत्रामध्ये सांबर, ससा, पाणकोंबळा, माकड, तरस, मोर, रानडुक्‍कर, भेकर, कोल्हा, मुंगुस या प्राण्यांचा सहवास असल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु, या गणननेमध्ये कोठेही बिबट्याचा उल्लेख आढळून आलेला नाही. 

वास्तविक पाहता यापूर्वीही भोर वन परिक्षेत्रामध्ये तीन मृत बिबटे आढळून आले होते. तसेच शिरुर,दौंड  या तालुक्यांमध्ये बिबट्याने अनेक वेळा जनावरांवर हल्‍ले केलेले आहेत. परंतु, उपवनसंरक्षक कार्यालयाकडून बिबट्याची गणनाच केली गेली नसल्याचे मुख्य वनसंरक्षकांना पाठविण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील वन्यजीवांच्या संख्येबाबतच्या अहवालावरून समोर येते आहे. पुणे वन परिक्षेत्रात नेमके किती बिबटे आहेत याची माहिती या कार्यालयाकडे उपलब्ध नाही.

याबाबत उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. दरम्यान, याबाबत वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक महेश भावसार म्हणाले की, दरवर्षी बौध्द पौर्णिमेला पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणार्‍या प्राण्यांचीच गणना केली जाते. इतर दिसणार्‍या प्राण्यांचीही नोंद विभागाकडून घेतली जात असते. पुण्याच्या वन परिक्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. परंतु, किती बिबटे आहेत हे सांगता येणार नाही.