Tue, Mar 19, 2019 03:17होमपेज › Pune › स्वामी समर्थ विद्यालयातील पेच सुटता सुटेना

स्वामी समर्थ विद्यालयातील पेच सुटता सुटेना

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 10:36PMभोसरी : विजय जगदाळे 

श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात पालक आणि संस्थाचालकांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून फी व विकास निधीवरून सरू असलेल्या वादाला कंटाळून संस्थाचालकाने शाळा सुरु ठेवण्यास नकार दिला आहे. तसेच माध्यमिक विद्यालयाच्या  मुख्याध्यापकांनी देखील राजीनामा  दिला आहे. तसेच विनाअनुदानित  तुकड्यातील शिक्षकांनीही  सोमवारपासून (दि. 9) शाळेत शिकविणार नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची चिंता पालकांनी  व्यक्त केली आहे.  

भोसरीतील इंद्रायणीनगरातील अनुदानित श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील  विद्यार्थ्यांकडून शाळा व्यवस्थापन फी घेत असल्याच्या विरोधात पालकांनी  आंदोलन केले होते .हा प्रश्न चर्चेतून सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि. 6) शाळेत  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पालक आणि संस्थाचालक यांची सभा घेण्यात आली. मात्र या वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि संस्थाचालक यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या विषयी भोसरी पोलिस ठाण्यात शिवसेनेचे  पदाधिकारी  आणि संस्थाचालकांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. शाळेत  पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांतील अनुदानित विभागात  एक हजार एकशे 56 आणि विना अनुादानित विभागात 566 विद्यर्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अनुदानित तुकड्यातील विद्यार्थ्यांकडूनही फी घेतली जात असल्याचे  व बनावट  पावत्या दिल्या जात असल्याचे पालकांचे म्हणणे  आहे. मात्र  अनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांकडून पालकांच्या संमतीने फक्त विकास निधी  घेतला जात असल्याचे संस्थाचालकाचे म्हणणे आहे. यावरून पालक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी सोमवारपासून  (दि 9) शाळेत शिकविण्यास नकार दिल्याने  पालक आणि संस्थाचालक यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान  होणार  आहे.  याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे.एकद्या शिक्षण संस्थेमध्ये बाऊंन्सर कशासाठी. शाळेत बाऊंन्सर आणल्यामुळे आणि पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे पालकांमध्ये भितीचे  वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. शासनाच्या नियम ह्या शिक्षण संस्थेसाठी लागू आहेत की नाही असा प्रश्न पडतो. जर संस्थाचालक शाळा सुरु ठेवण्यास तयार नसतील तर या ठिकाणी प्रशासक नेमून शाळा सुरु ठेवावी,अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.