Sat, Mar 23, 2019 00:27होमपेज › Pune › पुणेकरांना आजपासून झळ

पुणेकरांना आजपासून झळ

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

आंदोलनामुळे पुणे शहरासाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातून होणारे दूध संकलन कमी झाले असून, शहरात दूध टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. बंदोबस्तात दूध टँकर आणावयाचे म्हटले तरी संकलनच घटू लागले असून, दूध आंदोलनाची झळ आजपासून पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे.कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे म्हणाले की, संघाचे रोज सव्वादोन लाख लिटरइतके संकलन होते. सोमवारी फक्त 60 ते 65 हजार लिटरच संकलन झाले. गावातील सोसायट्यांकडे शेतकर्‍यांकडून दूध घातले जात नाही. त्यामुळे मंगळवारपासून संघाकडे दुधाची उपलब्धता विक्रीसाठी कमी राहील, अशी शक्यता आहे. 

महानंदला दिवसाआड मुंबईला 10 हजार लिटर दूध कात्रजकडून दिले जाते. दुधाच्या उपलब्धतेनुसार दूध मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे हिंगे यांनी सांगितले.
दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले की, राजारामबापू दूध संघाचे रोजचे अडीच लाख लिटर संकलन आहे. आम्ही संकलन बंद केले आहे. शेतकर्‍यांच्या दुधाला शासनाने पाच रुपये लिटरला भाव देण्याची मागणी आहे. त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा. चितळे दुधाचे संचालक श्रीकृष्ण चितळे पुढारीशी बोलताना म्हणाले की, आमचे साडेचार ते पाच लाख लिटर दुधाचे रोजचे संकलन आहे. सोमवारी ते कमी झाले असून, सांगलीहून पोलिस बंदोबस्त मिळाला तर ते पुण्यात विक्रीसाठी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. गणेश पेठ दूध भट्टी केंद्रावर पुणे जिल्ह्यातून म्हशीच्या दुधाची साडे चार ते पाच हजार लिटरइतकी नियमित आवक झाल्याची माहिती व्यापारी दामोदर हिंगमिरे यांनी दिली. 18 लिटर घागरीचा भाव 900 रुपये याप्रमाणे स्थिरच होता. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड योगेश पांडे म्हणाले की, मागील एक महिन्यापासून सरकारबरोबर वारंवार पत्रव्यवहार व समक्ष गाठीभेटी घेऊनही दखल घेतली नाही. दूध उत्पादक शेतकर्‍यांना लिटरला पाच रुपये अनुदान देण्याचा विषय बाजूला ठेवला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित शेतकर्‍यांना लिटरला पाच रुपये अनुदान दयावे. शेतकर्‍यांनी गावोगावी फुकट दूध देण्यास सुरुवात केलेली आहे. 

गणराया सरकारला सद्बुध्दी दे : खा. राजु शेट्टी यांचे साकडे

शेतकर्‍यांच्या दुधाला लिटरला पाच रुपये अनुदान द्यावे आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांवरील संकट दूर करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुध्दी द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी सोमवारी सकाळी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले. त्यांनी गणपतीची आरतीही केली. यावेळी त्यांच्यासमवेत रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, अ‍ॅड. योगेश पांडे, प्रल्हाद इंगोले, सावकार मदनाईक, संजय बेले, मिलिंद साखरपे आदी मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव संघटनेला प्राप्त झालेला नाही. अधिकार नसलेल्या लोकांनी या विषयात लुडबुड करु नये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून बोलावे व प्रश्‍नांची सोडवणूक करावी. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी माहिती खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी दिली.