Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Pune › पालिका प्रशासनाच्या ‘खाबूगिरी’मुळे स्मार्ट सिटी बकाल

पालिका प्रशासनाच्या ‘खाबूगिरी’मुळे स्मार्ट सिटी बकाल

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:38AMपिंपरी : प्रतिनिधी

वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असून पाणीटंचाई, वाढती गुन्हेगारी, निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ आणि पालिका अधिकार्‍यांची ‘खाबूगिरी’मुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी बकाल झाली आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका प्रशासनावर गुरुवारी (दि. 23) केला. मात्र, त्यांनी सत्ताधारी भाजपबद्दल एक शब्दही उच्चारला नाही.

पालिकेतील शिवसेना गटनेत्याच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक नीलेश बारणे, प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.  शहरातील विविध प्रश्नासंदर्भात खा. बारणे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीची माहिती देताना ते बोलत होते.

खा. बारणे म्हणाले की, विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. विक्रेत्यांकडून स्थानिक गुंड व राजकीय कार्यकर्ते राजरोसपणे हफ्ते गोळा करीत आहे. विविध भागांमध्ये कचरा समस्या कायम आहे. शहरातील तब्बल 38 टक्के पाणी गळतीमुळे काही भागात पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा विभागात नियोजनाचा अभावामुळे ही परिस्थिती ओढविल्याचा आरोप त्यांनी केला.दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करूनही  निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.  केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीमध्ये संगनमत करून निविदा काढून भ्रष्टाचार केला जात आहे. 

भ्रष्टाचारांची पाठराखण न करता पारदर्शक अंमलबजावणी करावी. सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करणे सोडून  शहराच्या विकासकामांना गती देऊन खर्‍या अर्थाने पारदर्शक कारभार करण्याचा सल्‍ला त्यांनी आयुक्तांना दिला. कोट्यवधी खर्च करूनही केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत आणि राहण्याजोगे शहर सर्वेक्षणानुसार पिपंरी-चिंचवड पिछाडीवर पडणे, ही बाब लज्जास्पद आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘पंतप्रधान आवास’बाबत केंद्राकडे तक्रार

पंतप्रधान आवास योजनेला केंद्राचा निधी मिळत असून, त्या संदर्भात केंद्राच्या संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याचे खा. बारणे यांनी स्पष्ट केले. मात्र, आजच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली नसून, मुख्यमंत्र्यांनीही त्यावर अद्याप काही कारवाई केली नसल्याचे आ. चाबुकस्वार यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघात पवना धरण असून, रखडलेल्या पवना बंद जलवाहिनी योजनेबाबत त्यांना विचारले असता, खा. बारणे यांनी या विषयावर नंतर सविस्तर बोलू असे सांगून बगल दिली. 

शिवसेना गटनेते व नगरसेवक गैरहजर

या बैठकीस शिवसेनेच्या गटनेत्यासह काही नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेत गटबाजी असल्याचे उघड झाले. गटनेत्याच्या दालनात पत्रकार परिषदे असून, गटनेते राहुल कलाटे यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित नव्हते. त्याचबरोबर एकच दिवशी शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी वेगवेगळी पत्रकार परिषद घेतल्याबद्दल विचारले असता, आयुक्तांसोबत बैठक पूर्वनियोजित असल्याचे उत्तर खा. बारणे यांनी दिले.