Tue, Apr 23, 2019 13:41होमपेज › Pune › वृक्ष लागवड मोहिमेसाठी जागाच नाही

वृक्ष लागवड मोहिमेसाठी जागाच नाही

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:12AMपुणे : सुनील जगताप

राज्य शासनाच्या वतीने गेल्या तीन वर्षापूर्वी वृक्ष लागवड मोहीम राज्यभर सुरु केलेली आहे. वास्तविक पाहता यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये जागाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाच्या नियोजनाअभावी केवळ चमकोगिरी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

शासनाच्या वन विभागाच्या वतीने राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिम राबविण्याचा उपक्रम सुरू आहे. पहिल्या वर्षी वृक्षारोपण मोहिमेमध्ये दोन कोटी, गेल्या वर्षी 4 कोटी वृक्ष लागवड तर यावर्षी तब्बल 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आखण्यात आलेले आहे. गेल्या दोन वर्षामध्ये लावलेल्या वृक्षांची अवस्था सध्याच्या परिस्थितीत चांगली नाही.  काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक संस्थांच्या वतीने त्याच-त्याच जागी वृक्षारोपण केले जात आहे. 

शासनाने गेल्या वर्षी चार कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविल्यानंतर आजमितीला केवळ 60 टक्केच वृक्ष जगली असून त्यांची वाढही काही प्रमाणात खुंटलेली दिसून येत आहे. त्यातच यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीपैकी पुणे जिल्ह्याला तब्बल 56 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही मोहीम तब्बल एक महिना म्हणजेच 1 ते 31 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत फक्‍त 25 लाख वृक्ष लागवड पूर्ण झाली आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत एका झाडासाठी 2 ते 3 फुटापर्यंत जागा व्यापली जात असल्याने पुणे जिल्ह्यामध्ये जागाच शिल्‍लक नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यातच गेल्यावर्षी 22 लाखाचे असलेले उद्दिष्ट पूर्ण करीत 25 लाखापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली तर यावर्षी आजघडीला 25 लाख वृक्ष लागवड पूर्ण झालेली आहे. 

शासनाच्या वतीने पुढील वर्षी तब्बल 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. वास्तविक पाहता कोणतीही मोहीम हाती घेताना त्याचा संपूर्ण अभ्यास होणे अपेक्षित आहे. परंतु, त्याबाबत शासनाकडून कोणतीच खबरदारी न घेता चमकोगिरी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केली आहे. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, गेल्यावर्षी केलेल्या वृक्षरोपणामध्ये 60 ते 65 टक्के मोहीम यशस्वी झालेली आहे. यावर्षी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुढील वर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून राज्यभरामध्ये तब्बल 262 छोटी-मोठी धरणे असून त्यातील 22 मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा मानस असून त्याद‍ृष्टीने पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठका सुरू आहेत. तसेच कालव्याच्या दुतर्फाही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचा उपक्रम नक्‍कीच यशस्वी होणार आहे.