Sat, Apr 20, 2019 10:32होमपेज › Pune › पुणे : 'प्रकाश भवन'मध्ये वीजग्राहकांनाच नो एन्‍ट्री!

पुणे : 'प्रकाश भवन'मध्ये वीजग्राहकांनाच नो एन्‍ट्री!

Published On: Jun 28 2018 6:57PM | Last Updated: Jun 28 2018 6:57PM­­पुणे : प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांच्या कामाची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी, यासाठी महावितरण वीज कंपनीने पश्‍चिम महाराष्ट्रासाठी सुरू केलेल्या ‘प्रकाश भवन’ या कार्यालयात वीजग्राहकांनाच येण्यास ­मज्जाव करण्यात आला आहे. कार्यालयात प्रवेश करतानाच सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे द्यावीत लागत आहेत. तसेच आता साहेब भेटणार नाहीत दुपारनंतर या असे वक्त्यव्य ऐकण्याची वेळ सुध्दा ग्राहकांवर आली आहे. 

या मनमानीचा अनुभव खुद्द ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला सुध्दा आला आहे. विशेष म्हणजे पुण्यनगरीचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांना नवीन वीज जोडणीच्या कामासाठी त्यांचा प्रतिनिधी गेला असता त्यांना सुध्दा भेट नाकारली. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने दोन वर्षापूर्वी महावितरणच्या विविध अधिका-यांना तसेच वीजग्राहकांना ब-याचवेळा कामासाठी मुंबई येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात (प्रकाशगड) जावे लागत होते. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाया जात होता. तसेच अधिकारी भेटतीलच याची खात्री नसे. ही बाब लक्षात घेऊन उर्जा मंत्रालयाने राज्यात चार प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर येथील वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यातील सेनापती बापट रोडवर ‘प्रकाशभवन’ हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाची जबाबदारी प्रादेशिक संचालकांना देण्यात आली. 

प्रकाश भवन कार्यालायातच शिवाजीनगर विभाग आणि गणेशखिंड उपविभाग ही कार्यालये आहेत. शिवाजीनगर कार्यालय प्रकाशभवनच्या दुस-या आणि तिस-या मजल्यावर आहे. या कार्यालयात अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता बसतात. या दोन अधिका-यांकडेच वीजग्राहकांची विविध प्रकारची वीज संदर्भात कामे असतात. मात्र कार्यालयात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशव्दारावरच वीजग्राहकांना सोडण्यास सकाळी ११ ते २ या वेळेत मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वीजग्राहकांना वीज जोडणीबाबत काही माहिती तसेच रक्कम भरावयाची असल्यास त्यांना ती भरता येत नाही. विशेष म्हणजे ११ते २ यावेळेतच रक्‍कम भरता येत आहे. वेळ उलटून गेल्यानंतर वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

अधिका-यांनी अनिर्बंधपणे लादलेल्या अघोषित ‘नो एन्‍ट्री’चा फटका पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड आणि त्यांचे बंधू तसेच सहकारी नानासो निकम आणि बाजीराव शिंदे यांना बसला आहे. गायकवाड  यांना नवीन वीजजोडणी घ्यावयाची होती. त्याबाबत त्यांचे प्रतिनिधी सलग दोन वेळा कार्यालयात गेले असता दोन वाजण्याच्या अगोदर रक्कम भरण्यास जाऊन सुध्दा ते रक्कम भरू शकले नाहीत. वास्तविक पाहता कोटेशनची रक्कम भरण्याची वेळ सकाळी ११ ते २ अशी आहे. मात्र, प्रादेशिक संचालक यांनी लागू केलेल्या चुकीच्या सुरक्षा पध्दतीच्या फतव्यामुळे संबधीत कोटेशनची रक्कम भरता आली नाही.

अधिका-यांच्या चुकीच्या सुरक्षा धोरणामुळे अनेक वीजग्राहक प्रतिनिधी यांना कार्यालयीन वेळेत प्रवेश न मिळाल्यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम झालेला आहे. तसेच वीजग्राहकांना दुपारी ३ ते ५ ही भेटीची वेळ दिली आहे. मात्र त्यावेळेत अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी वीजग्राहकांनी केल्या आहेत. वीजग्राहकांची मागील एक ते दीड वर्षापासून प्रचंड गैरसोय होत आहे. परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे प्रकाशभवन नक्की कोणासाठी आहे. याचा उलगडा अजून तरी वीजग्राहकांना झालेला नाही.

मनमानीमुळे लिफ्ट बंद 

प्रकाशभवन कार्यालयात वीजग्राहक तसेच अधिका-यांना विविध मजल्यावर जाण्यासाठी दोन लिफ्ट आहेत. मात्र एका अधिका-यांचा अत्यंत मनमानीपणामुळे एक लिफ्ट केवळ संबंधित अधिका-याच्या वापरासाठी ठेवण्यात आली आहे. तर दुसरी लिफ्ट मात्र चालू असली तरी नागरिकांना प्रवेश देण्यात येत नसल्यामुळे ती सुध्दा बंदच असते.

 अधिका-यांना सुध्दा मनमानीचा फटका 

प्रकाश भवन मध्ये कार्यरत असलेले विविध पदांवरील उच्चपदस्थ अधिकारी तसेच इतर कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना सुध्दा संबंधित अधिका-यांच्या मनमानीपणाचा जबरदस्त फटका बसलेला आहे. संबंधित अधिकारी रात्री उशीरपर्यंत कार्यालयत बसून राहिला तरी इतर अधिकारी आणि कर्मचा-यांना घरी जाता येत नाही. अधिका-याच्या विरोधात जाण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कोणताही ठपका ठेवून कामावरून बडतर्फ करण्याचीच धमकी देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी सांगितली.

माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिनिधी नानासो निकम म्हणाले,‘‘ प्रादेशिक संचलाक कार्यालयातील अधिका-याच्या मनमानीपणाचा फटका बसल्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वीजजोडणीची रक्क्म भरता आली नाही. 

पुण्यात अनेक आयुक्त कार्यालये आहेत. मात्र संबंधित कार्यालयात आयुक्तांना सर्वसामान्य नागरिकांना कामानिमित्त भेटावयाचे असल्यास काही वेळातच भेट मिळते. मात्र प्रकाश भवन येथील कार्यालयातील अधिका-यांना भेटावयाचे असल्यास कधीच भेट मिळत नसल्याची बाब सुध्दा समोर आली आहे. त्यामुळे नागरिक संतापले असून, शहरातील भाजप, शिवसेना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांच्या काही नेत्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे संबंधित अधिका-याच्या विरोधात रीतसर तक्रार करणार आहेत.