पुणे : नरेंद्र साठे
जिल्हा हा हागदणारीमुक्त झाल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे; मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील 380 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वच्छतागृह नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे नाइलाजाने स्वच्छतेसाठी इतरत्र जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा शंभर टक्के हागदणारीमुक्तचा दावा पुर्णपणे फोल ठरल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये लाखो स्वच्छतागृह तयार केल्याचा दावा केला आहे खरा; मात्र जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी 224 मुलांचे तर 156 मुलींच्या स्वच्छतागृहे विद्यार्थ्यांच्या वापराविना आहेत. काही ठिकाणी स्वच्छतागृहे ही मोडकळीस आलेली आहेत तर काही ठिकाणी पाण्या अभावी वापरता येत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यात एका बाजुला जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असताना, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांधील विद्यार्थीसंख्या समाधानकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा देणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या या 380 शाळांमधील स्वच्छतागृहांची अवस्था मोडकळीस आलेले दरवाजे, अस्वच्छ, अशी असल्याने ती नावापुरतीच उरली आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 675 शाळा आहेत. त्यापैकी मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यामध्ये शाळेच्या भौतिक सोयी-सुविधांबाबत मानके व निकष ठरवण्यात आले आहेत. या मानकांनुसार वर्गखोल्या, शैक्षणिक साहित्य, स्वच्छतागृहे, किचन शेड, रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि संरक्षक भिंती, या निकषांची पूर्तता केल्याखेरीज शाळा स्थापन करण्यास परवानगीच नाही. हा नियम सरकारी शाळांसह खासगी शाळांनाही लागू आहे. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे जिल्ह्यातील काही शाळांमधील चित्र आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
शाळांमध्ये स्वच्छतागृहे नादुरूस्त असल्याने मुला-मुलींना उघड्यावर स्वच्छतेसाठी जावे लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थीनी इतरत्र जाण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे विद्यार्थीनींना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.