होमपेज › Pune › पेठांमध्ये भुयारी मेट्रो मार्गाशिवाय पर्याय नाही

पेठांमध्ये भुयारी मेट्रो मार्गाशिवाय पर्याय नाही

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

शहरातील पेठांमधून मेट्रोचा मार्ग भुयारी असणार आहे. या मार्गामुळे या भागातील अनेक घरे बाधीत होत आहेत. त्यामुळे याठिकाणी उन्नत मेट्रो करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र पेठांमधील रस्ते अरुंद असल्यामुळे ते शक्य नाही. याशिवाय उन्नत आणि भुयारी मेट्रोविषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे आढळून येत आहे. हे गैरसमज दूर करून शहरातून भुयारी मेट्रो मार्ग कसा करण्यात येणार आहे याविषयी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी नागरिकांसाठी आयोजित संवादात  माहिती दिली. 

नागरिकांमध्ये मेट्रो म्हटली की फक्त भुयारीच असावीहा  एक गैरसमज दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी संगितले. सध्या पुणे शहर हे वास्तव्यासाठी देशातील क्रमांक एकचे शहर म्हणून सर्वेक्षणात आढळले आहे.  त्यामुळे भविष्यात या शहराने वाहतुक सुविधांसाठी सज्ज होणे आवश्यक असल्याचे  लिमये यांनी सांगितले आहे. जगात कोणत्याही शहराची लोकसंख्या 10 लाखाच्या जवळ असल्यास त्यांनी मेट्रोचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या पुणे शहर 45 लाखाच्या आसपास आहे, त्यामुळे येथे मेट्रो मार्गांचा विस्तार होणे आवश्यक झाले आहे. 

भुयारी खोदकामाला लागणार 7 ते 8 महिन्यांचा कालावधी भुयारी मार्गाचा बोगदा खोदण्यासाठी शहराच्या मेट्रो प्रकल्पामध्ये एकुण 4 टनेलिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे. बोगदा खणण्यासाठी जमिनीत या मशिन घालण्यासाठी सध्या कृषी महाविद्यालय आणि स्वारगेट या दोन ठिकाणी खड्डे खोदाई सुरू आहे. पुण्यात सर्व ठिकाणी बेसॅाल्ट खडक असल्यामुळे भुयारी मार्गाच्या कामात जमिनीतील पाण्याचा अडथळा येणे शक्य नाही. मात्र टनेलिंगसाठी लागणार्‍या टिबीएम मशिन एकदा जमिनीत घातल्यानंतर कोणतीही अडचण आली तर मधूनच काढता येणे शक्य नसते. त्यामुळे भुयारी मार्गाची आरेखने, इतर तांत्रिक बाजू काळजीपूर्वक पूर्ण कराव्या लागणार आहेत. पुढील वर्षभर भुयारी मार्गाच्या टनेलिंगचे काम सुरू राहणार आहे.

शहरातील पेठांमध्ये अनेक जुने वाडे आणि घरे आहेत. मेट्रोसाठी भुयारी मार्ग करताना या जुन्या वाड्यांना धोका पोहोचू शकतो. यासाठी जी घरे या मार्गात येतात त्यांचे स्थलांतर किंवा पुनर्वसन करावे लागणार आहे. असे असताना काही लोकांचे म्हणणे आहे की जर येथून उन्नत मेट्रो (एलिव्हेटेड) केली तर आमची घरे बाधीत होणार नाहीत. मात्र उन्नत मेट्रो करण्यासाठी किमान 22 मीटरचा एक खांब बांधावा लागतो. इतका रुंद रस्ता या पेठांमध्ये कोठेही नसल्याचा दावा  लिमये यांनी केला आहे. त्यामुळे पेठांमध्ये भुयारी मार्गाशिवाय पर्याय नाही.