Sat, Jul 20, 2019 21:43होमपेज › Pune › निवान ठरला जागतिक खेळाडूंमध्ये दहावा

निवान ठरला जागतिक खेळाडूंमध्ये दहावा

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:14AMपुणे : प्रतिनिधी

आवड व प्रबळ इच्छाशक्ती यामध्ये वय हे अडथळा ठरू शकत नाही, हीच गोष्ट पुण्याच्या निवान खंडाडिया या मुलाने वयाच्या फक्त सहाव्या वर्षी भारतातील सर्वात तरुण अव्वल बुद्धिबळपटू आणि जागतिक बुद्धिबळ फेडरेशनने मे 2018 मध्ये जाहीर केलेल्या रेटिंग यादीनुसार 1137 इएलओ पॉइंट्स मिळवून जागतिक खेळाडू मध्ये दहावा क्रमांक मिळवून साध्य केली आहे.

निवान अल्बेनिया येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक शाळा बुद्धिबळ चॅम्पियनशिपचा एक भाग होता. तेथे त्याने यु - 7 मध्ये नऊ फेर्‍यांमध्ये चार गुण मिळवले आणि पुढच्या वेळेस विजेतेपद मिळवण्याची प्रतिज्ञा केली. निवान हा मगरपट्टा येथील विबग्योर हायस्कूलच्या के.जी.चा विद्यार्थी आहे. निवानची या खेळाशी ओळख त्याच्या वडिलांनी तो केवळ साडेचार वर्षाचा असताना करून दिली होती.त्यांने हा खेळ केवळ दोन दिवसांतच आत्मसात केला होता आणि केवळ तिसर्‍या दिवशी या बुद्धीबळपटूने त्यांना हरवून मोठा धक्काच दिला. कोरेगाव पार्क अनेक्स येथील दक्षिण मुंबई चेस अकादमी (एसएमसीए) मधील प्रशिक्षक विश्‍वनाथ शांडिल्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवान खंडाडिया प्रशिक्षण घेत आहे. 

याबाबत निवानची आई प्रिती यांनी याप्रसंगी एसएमसीए आणि त्याचे प्रशिक्षक बादली आणि शांडिल्य यांची प्रशंसा करून सांगितले की, माझ्या मुलाला योग्य दिशेने प्रगतीकडे नेण्याकरता मी एसएमसीए ची आभारी असून या दरम्यान त्यांचा खरोखरच पाठिंबा मिळत होता, मी त्याला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल तसेच या क्रिडाप्रकारात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  त्यांची सदैव आभारी राहीन.

निवान आपल्या खेळाकरिता दररोज चार पाच तास देत असून आपला खेळ अजून कसा उंचावेल हे पाहत आहे. यात आश्‍चर्य नाही कि त्याने जिल्हा आणि राज्यस्तरावर एकूण 17 ट्रॉफी आणि 9 पदके मिळवली आहेत. जिल्हा पातळीवर तो तिसर्‍या क्रमांकावर राहिला असून राज्य शालेय स्तरावर सातवा क्रमांकावर आहे. निवान नॉर्वेजिअन ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनचा प्रबळ प्रशंसक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.