Sat, Mar 23, 2019 02:26होमपेज › Pune › ग्रामीण पोलिसांची झोळी फाटकी

ग्रामीण पोलिसांची झोळी फाटकी

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:41AMपुणे ; नवनाथ शिंदे

जिल्ह्यातील महिला सुरक्षिततेसाठी स्थापन केलेल्या निर्भया पथकांसाठी असलेल्या वाहनांच्या डिझेलसाठी जिल्हा परिषदेने 2017-18 मध्ये 15 लाखांची तरतूद केली होती. मात्र, ग्रामीण पोलिस दलातील अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे आणि कागदपत्रांच्या अभावामुळे इंधनावरील खर्चाची बिले जिल्हा परिषदेला सादर करण्यात आली नाहीत; त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाकडून निर्भया पथकातील वाहनांच्या  इंधनाला देण्यात येणारा निधी वितरित न करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे.

महिलांच्या सुरिक्षततेसाठी तसेच छेडछाडीच्या विरोधात निर्भया पथकाद्वारे चारचाकी वाहनांतून गस्त घालण्यात येते. जिल्ह्यातील बारामती, दौंड, भोर, हवेली, खेड, जुन्नर, देहूरोड आणि लोणावळा विभागात या पथकाकडून महिलांच्या सुरक्षेबाबत दक्षता घेतली जाते. या निर्भया पथकांच्या वाहनांच्या इंधनासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने तरतूद करण्यात आली हेाती. त्यामध्ये  2016-17 मध्ये 4 लाख 32 हजारांचा खर्च करण्यात आला होता.

मात्र, ग्रामीण पोलिस प्रशासनाकडून इंधन खर्चाचा तपशील जिल्हा परिषदेला देण्यात आला नाही;  त्यामुळे जिल्हा परिषदेने निर्भया पथकातील वाहनांच्या इंधनासाठी दिलेल्या निधीचा खर्च इंधनासाठीच करण्यात आला की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. 2017-18 च्या अर्थसंकल्पात निर्भया पथकाच्या वाहनांच्या इंधनासाठी 15 लाखांची तरतूद केली होती. मात्र, आर्थिक वर्षपूर्तीला अवघे 16 ते 18 दिवस शिल्लक राहिले आहेत; मात्र, अद्यापही ग्रामीण पोलिसांकडून महिला बालकल्याण विभागाकडे निधी वर्ग करण्यासाठी पाठपुरावा केला नाही.

त्यामुळे मंजूर तरतूद माघारी जाण्याची शक्यता निर्माण होणार आहे; त्यामुळे ग्रामीण पोलिसांना निर्भया पथकातील वाहनांवर इंधनासाठी खर्च करण्यासाठी पैशाची आवश्यकता नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेकडून निधी मिळविण्यासाठी पोलिसांनी कोणताच पत्रव्यवहार न केल्यामुळे निधी मिळण्यास आडकाठी निर्माण झाली आहे. 

पत्रव्यवहाराला उत्तर नाही निर्भया पथकाच्या वाहनांच्या इंधनावर मंजूर निधीचा खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण पोलिस कार्यालयाशी पत्रव्यवहार केला; तसेच दोन वेळा तोंडी सूचना केल्या. मात्र, पोलिसांनी पत्रव्यवहाराची साधी दखलही घेतली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहेे.