Sat, Apr 20, 2019 08:17होमपेज › Pune › हिंजवडीसह नऊ गावे पिंपरी महापालिकेत 

हिंजवडीसह नऊ गावे पिंपरी महापालिकेत 

Published On: Feb 06 2018 1:16PM | Last Updated: Feb 06 2018 1:16PMपिंपरी : प्रतिनिधी 
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तीर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास सर्वसाधारण सभेने उपसूचनेसह मंजुरी दिली. सध्याच्या समाविष्ट गावांना महापालिका चांगल्या प्रकारे सुविधा पुरवू शकत नाही. नव्याने गावे समाविष्ट करून पाणी, कचरा व इतर समस्या अधिक गंभीर होणार आहेत. तिथे धनकवडी, रहाटणी व काळेवाडीप्रमाणे बकाल वस्ती होण्याची भीती व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध नोंदविला.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे; तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीच्या नैसर्गिक हद्दीपर्यंतच्या देहूगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र महापालिका हद्दीत समावेशाचा प्रस्ताव आयुक्तांनी मांडला होता. त्यावर सभेत जोरदार चर्चा झाली. दत्ता साने म्हणाले की, सध्या समाविष्ट गावांत मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात नसून, नव्या गावांनाही या समस्येस तोंड द्यावे लागणार असल्याने या विषयाला राष्ट्रवादीचा विरोध आहे. नव्या गावांमुळे पाणीटंचाईत भरच पडणार असल्याची शंका पंकज भालेराव यांनी व्यक्त केली. संबंधित ग्रामपंचायतींची मते लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी व्यक्त केले. गावे समाविष्ट करून अनधिकृत बांधकामांना चालना देऊन बकालपणा वाढीस प्रोत्साहन देऊ नये. डीपीची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी. 

शहरातील अनेक भागात पाणीटंचाईचा प्रश्‍न आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असल्याने पवना बंद जलवाहिनी मार्गी लावावी. त्यानंतर तातडीने सदर गावे समाविष्ट करावीत; अन्यथा ती गावे बकाल होऊ शकतात, असा मुद्दा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मांडला. कचरा समस्येवर आंदोलन केल्याने नगरसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत. या काळात गावे महापालिकेत समाविष्ट करून तेथील रहिवाशांच्या शिव्या खायचा का, असा सवाल शिवसेनेच्या मिनल यादव यांनी उपस्थित केला. मनसेचे सचिन चिखले म्हणाले की, समाविष्ट गावांमध्ये अनेक अडचणी व प्रश्‍न प्रलंबित असून, नव्या गावांची भर पडल्याने त्यात वाढ होईल.

सध्या समाविष्ट गावांतील डीपीनुसार विकास झाला का, असा सवाल भाजपाचे संदीप वाघेरे यांनी उपस्थित केला. भाजपाचे बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले की, गहुंजेत काही भागात महापालिका पाणीपुरवठा करते; तसेच देहूगावात रस्ते, पालखी सोहळा व स्मशानभूमीसाठी पालिका खर्च करते. तेथील रहिवाशांची महापालिकेत समावेश करण्याची मागणी आहे. पालिकेत समावेश झाल्याने या गावांना मोठा निधी मिळून विकास होईल. समाविष्ट गावांचा विकास केला जाणार असल्याने भाजपाचे विकास डोळस, राहुल जाधव, केशव घोळवे, सुवर्णा बुरुटे, रेखा दर्शिले, अश्‍विनी जाधव, सारिका बोर्‍हाडे, माई ढोरे, सोनाली गव्हाणे यांनी प्रस्तावाचे स्वागत केले. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाची विकासाची बाजू सविस्तरपणे मांडून या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली. 
 

अधिकार्‍यांकडून नगरसेवकांची चेष्टा
समाविष्ट गावांतील विकासावरून प्रशासन खेळ करीत आहे. नगरसेवकांनी पक्षभेद बाजूला ठेवून महापालिकेत विश्‍वस्त म्हणून काम केल्यास सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत; मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रहाटणी, काळेवाडी, रुपीनगर, वाल्हेकरवाडी येथे बेसुमार अनधिकृत बांधकामे उभी राहून तो परिसर बकाल झाला आहे. नव्या गावांची स्थितीही तशी होऊ नये, असा मुद्दा राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर यांनी मांडला. डीपी जाहीर होण्यापूर्वी तो बांधकाम व्यावसायिकांपर्यत कसा पोचतो? त्यात अधिकारी सामील आहेत. अधिकार्‍यांनी नगरसेवकांमधील चेष्टा-टवाळी व गंमत-जंमत न पाहता ताबडतोब कामे करावीत, असा सल्ला त्यांनी दिला.