Thu, Apr 25, 2019 13:44होमपेज › Pune › येत्या ४८ तासांत कोकण, विदर्भात उष्णतेची लाट

येत्या ४८ तासांत कोकण, विदर्भात उष्णतेची लाट

Published On: Feb 28 2018 7:24PM | Last Updated: Feb 28 2018 7:24PMपुणे : प्रतिनिधी

राज्यात उष्णतेचा तडाखा हळूहळू वाढत असून, बुधवारी तीव्र उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरी 34 अंश सेल्सियस, तर कोकण, मुंबईत सरासरी 32 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसाप्रमाणेच रात्री व पहाटेदेखील सुखद गारवा गायब झाला असून, सकाळी नऊ वाजल्यापासून अनेक ठिकाणी सूर्य अक्षरशः आग ओकताना दिसत आहे. दरम्यान, येत्या 48 तासांत कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

एरव्ही विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा नवा नाही; मात्र मार्च महिन्यातच हा अंदाज वर्तविण्यात आल्याने एप्रिल व मे महिन्यांमध्ये उष्णतेचा कहर नवनवे उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत बुधवारी लक्षणीय वाढ, तर कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महत्त्वाच्या शहरांमध्ये पुणे 14.9, मुंबई 21, रत्नागिरी 19.7, नगर 14.6, कोल्हापूर 18.9, नाशिक 16.2, सांगली 17.1, सातारा 15.9, सोलापूर 20.5, औरंगाबाद 18.6, नागपूर 16 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदविले गेले.