Mon, Jun 24, 2019 21:14होमपेज › Pune › नवनिर्वाचित महापौर आणि वाद बनतेय एक समीकरण  

नवनिर्वाचित महापौर आणि वाद बनतेय एक समीकरण  

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 12:49AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पंचविसावे आणि भाजपचे दुसरे महापौर राहुल जाधव आणि वाद हे नवे समीकरण तयार होऊ पाहात आहे. महापौरपदी निवडीपूर्वी आणि त्यानंतरही जाधव विविध वादांत गुंतत चालले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

स्थायी समितीवर जाण्यासाठी प्रत्येक नगरसेवक तीव्र इच्छुक असतात. मात्र, राहुल जाधव यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एकाही सभेला हजेरी लावली नाही. त्यावरूनच ते महापौरपदासाठी तीव्र इच्छुक असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यासाठी तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनीही आपला राजीनामा देऊ केला.प्रत्यक्ष महापौरपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड पक्‍की झाली. महापौरपदाची निवडणूक शनिवारी (दि. 4) झाली, मात्र त्यापूर्वीच उतावळे महापौर व त्यांच्या समर्थकांनी शहरभर अभिनंदनाचे होर्डिंग्ज  लावले होते. महापौरनिवडीच्या वेळी जाधव यांनी परिधान केलेल्या महात्मा जोतिबा फुलेंसारख्या वेशभूषेचे कौतुक झाले. 

मात्र, त्यांच्या समर्थकांनी पालिका भवनात केलेल्या भंडार्‍याच्या मनसोक्‍त उधळणीमुळे निर्माण झालेल्या चिखलात घसरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. या प्रकारावर विरोधकांसह शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आनंदोत्सवाचा असा उन्माद सुसंस्कृत पक्षाकडून अपेक्षित नसल्याचे सांगत भाजपचे कानही टोचले गेले. या प्रकारावरून नवनिर्वाचित महापौरांना आपल्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी दिलगिरी व्यक्‍त करावी लागली. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासोबत जुने संबंध असल्याने जाधव हे विरोधकांच्या आहारी जातील, अशी शंकाही उपस्थित होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे झाले नाही. उलट, दत्ता साने यांनी भंडारा उधळणप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली. विरोधकांच्या आंदोलनास एक न्याय व सत्ताधार्‍यांना वेगळा न्याय, असा भेदभाव केला जात असल्याची टीका त्यांनी सत्ताधार्‍यांसह आयुक्‍तांवर केली. 

जाधव हे पहिल्या टर्मला 2012ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करीत ते आमदार महेश लांडगे यांच्या गटात सामील झाले. आता ते भाजपचे नगरसेवक आणि महापौर आहेत. एका व्यायामाशाळेच्या उद्घाटनास शुक्रवारी शहरात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. त्यांच्यासमोर नतमस्तक होत जाधव यांनी पूर्वीच्या नेत्यांबद्दल प्रेम व्यक्‍त केले. त्या कृतीवरून जाधव यांच्यावर टीका सुरू झाली आहे.  नवनिर्वाचित महापौर जाधव यांचा आतापर्यंत केवळ आठ दिवसांचा प्रवास पाहता ते सतत विविध कारणांनी निर्माण होणार्‍या वादात अडकत आहेत. त्यामुळे त्यांचा सव्वा वर्षाच्या कार्यकाळ खडतर ठरतो की मागील महापौर नितीन काळजेंप्रमाणे सुरळीत जातो, त्याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.