होमपेज › Pune › नव्या आयुक्तांच्या स्वागताला कचराच!

नव्या आयुक्तांच्या स्वागताला कचराच!

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी पदावरून महापालिका आयुक्तपदावर रुजू होणार्‍या सौरभ राव यांना सुरुवातीलाच शहराच्या कचरा प्रश्‍नाला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर रखडलेली भामा-आसखेड योजना, वाहतूक सुधारणा आणि पे अ‍ॅन्ड पार्क अशा योजनांबरोबरच नदी सुधारणा आणि शहराच्या हद्दीतील रिंगरोड असे महत्त्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे.

महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांना केंद्रीय सहसचिवपदी बढती मिळाली. दहा दिवसांपूर्वी त्यांनी आयुक्तपदाचा पदभार सोडला,  तेव्हापासून आयुक्तपद रिक्त होते. पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले राव हे आयुक्तपदी येणार, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. अखेर सोमवारी त्यांच्या आयुक्तपदाच्या नियुक्तीचे आदेश निघाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हाधिकारी पदावर काम केल्याने राव यांना शहराच्या प्रश्‍नांची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे पालिका आयुक्तपदावर त्यांची नियुक्ती शहराचे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

नवे आयुक्त राव यांचे महापालिकेत स्वागत हे शहराच्या कचरा प्रश्‍नानेच होणार आहे. उरुळी-फुरसुंगी ग्रामस्थांनी 20 एप्रिलपासून कचरा डेपो बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कचरा प्रश्‍न पेटण्याची शक्यता आहे. राव यांना पालिकेत आल्यानंतर पहिल्यांदाच हाच प्रश्‍न मार्गी लावावा लागणार आहे. विशेष म्हणजे त्यांना या प्रश्‍नाची माहिती आहे, त्यामुळे हा प्रश्‍न आता ते कसा हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हाधिकारी पदावर असताना भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र, हा तिढा अद्याप कायम आहे. ही योजना मार्गी लागल्यास शहराच्या पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे आयुक्तपदी आल्यावर भामा-आसखेडचा तिढा सोडविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. 

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर आहे. तो सोडविण्यासाठी माजी आयुक्तांनी पे अ‍ॅन्ड पार्किंग योजना आणली. त्यास मंजुरीही मिळाली; मात्र, या योजनेला प्रचंड विरोध आहे. त्यामुळे पे अ‍ॅन्ड पार्क योजनेसाठी मध्यम मार्ग ते कसा काढणार याबाबत उत्सुकता आहे. शहराच्या हद्दीतील रिंगरोड (एचसीएमटीआर), त्याचबरोबर नदी सुधारणा योजनेचा मोठा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे.  समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला आता सुरुवात होत आहे. याशिवाय शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, विकासकामांमधील गैरव्यवहारांचे वाढते प्रकार, असे विविध प्रश्‍न राव यांच्यासमोर आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना विश्‍वासात घेऊन, हे प्रश्‍न मार्गी लावण्याचे कसब राव यांना दाखवावे लागणार आहे.