Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना पोलिस कोठडी

राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना पोलिस कोठडी

Published On: Aug 01 2018 10:18PM | Last Updated: Aug 01 2018 10:18PMपुणे : प्रतिनिधी 

माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पुढील १० दिवसांत त्यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिल्यानंतर बुधवारी (1 ऑगस्ट) ते पोलिसांसमोर हजर झाले. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई  करून न्यायालयात हजर  करण्यात आले. त्यांना विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी  ६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सलग तीन उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवल्याने मानकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६), विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़  शांतीनगर येरवडा), नाना कुदळे (रा़  केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कर्नाटकी यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दिपक मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्‍यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र, तीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली होती.  

मानकर यांना बुधवारी अटक करून न्यायालयात सायंकाळी 6.15 वाजू मिनिटांनी हजर करण्यात आल्यानंतर जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी युक्तिवाद केला. मृत जितेंद्र जगताप हे मानकर यांच्या जमिनीची देखभाल करत होते. प्राथमिक दृष्ट्या हा गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही मानकर यांचा जामीन फेटाळला आहे.  मानकर हे टोळीचे प्रमुख असून त्यांचा व्ययवसाय हा दहशतीच्या जोरावर जागेचे ताबे घेणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ॲड. पवार यांनी केली. 

बचाव पक्षाच्या वतीने ॲड. सुधीर शहा, ॲड. चिन्मय भोसले, ॲड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले.  शहा म्हणाले, आजवर मानकर यांच्यावर दाखल असलेल्या 15 गुन्ह्यामध्ये 14 गुन्ह्यामध्ये कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. एक गुन्हा उच्च न्यायालयात प्रलंबित असून, त्या गुन्ह्यातही त्यांची काही भूमिका नाही. त्यामुळे या प्रकरणात लावण्यात आलेला मोक्का चुकीच्या पद्धतीने लावला आहे. मूळ जमीनही मानकरांचीच असून मृत जगताप हे तेथे देखभाल करत होते. त्यामुळे या प्रकरणात 306 लागू होत नाही.