Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Pune › ..किस्सा पगडी का? दिवसभर चर्चेत!

..किस्सा पगडी का? दिवसभर चर्चेत!

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:40AMपुणे : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी झालेल्या हल्‍लाबोल सांगता सभेत रंगलेला पगडीचा किस्सा सोमवारी दिवसभर चर्चेत राहिला. यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही, तर फुले पगडीनेच स्वागत करायचे, असा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली. 

पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे; मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात शरद पवारांनी छगन भुजबळांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीने सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांचे स्वागत पुणेरी पगडीने झाले. त्यानंतर उशिरा मंचावर आलेल्या भुजबळांचे स्वागतही पुणेरी पगडीने करण्यात आले. भुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने त्यांचा सत्कार केला. 

या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे म्हणाले, हल्लाबोल सभेत छगन भुजबळ यांचे पुणेरी पगडीने केलेले स्वागत शरद पवारांना आवडले नाही. त्यांनी मला त्यांचे भाषण सुरू होईपर्यंत फुलेपगडी मिळेल का, असे विचारले. मी पाहतो असे सांगितले.मी स्टेज व्यवस्था पाहणारा कार्यकर्ता संतोष नांगरे ह्याला ती पगडी आण, असे सांगितले, जवळपास कुणाकडेच ती असण्याची शक्यता नव्हती. पण त्याने सरळ चोळखण आळी गाठली. ते अंतर 4 ते 5 किलोमीटर असेल. मुरुडकर यांच्या दुकानातून ती घेतली, शरद पवार यांचे भाषण सुरू होण्याची वेळ आली होती. आम्ही सर्वजण आता ती पगडी येत नाही, असेच समजत होतो; पण तेवढ्यात संतोष ती पगडी घेऊन पोहचला,आणि साहेबांनी भाषण सुरू करतानाच ती भुजबळसाहेबांना देण्यास वंदना चव्हाण आणि संजोग वाघेरे यांना सांगितले.