Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Pune › आयुक्‍तालयापेक्षा कायदा-सुव्यवस्था राखण्याची  इच्छाशक्‍ती हवी : अजित पवार

आयुक्‍तालयापेक्षा कायदा-सुव्यवस्था राखण्याची  इच्छाशक्‍ती हवी : अजित पवार

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 1:11AMपिंपरी: प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तालय मंजूर करण्यात आले आहे; परंतु आयुक्तालय असण्यापेक्षा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आवश्यक असते आणि ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये नाही हे विविध घटनांतून सामोरे आल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी व्यक्त केले.

भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील मोकळ्या जागेवर आयोजित हल्लाबोल सभेत  ते बोलत होते. या वेळी खा. सुप्रिया सुळे,  गटनेते आ. जयंत पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, माजी आ. विलास लांडे, बापूसाहेब पठारे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला  शहराध्यक्ष नगरसेविका वैशाली काळभोर, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, दत्ता साने, नाना काटे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमा कोरेगावच्या उत्सव असेल तर त्यासाठी आमच्या सरकारच्या काळात आठवडाभर अगोदर पोलिस यंत्रणा काम करीत होती; मात्र भाजप सरकारच्या काळात या गोष्टींची गंभीरता नसल्यामुळे भीमा कोरेगावची घटना घडली असे पवार म्हणाले. जातीय तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील शेतकरी देशोधडीला लावण्याचे पाप भाजपने केले आहे. भविष्यात हा धोका पत्करावयाचा नसेल तर राष्ट्रवादीला व त्याअनुषंगाने शरद पवार साहेब यांचे हात बळकट करा, असे आवाहन पवार यांनी केले.

केंद्रात, राज्यात व महापालिकेमध्ये भाजपचे सरकार आहे. शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. तरीही त्यांनी तो अधांतरीच ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर तर पालकमंत्री बापट यांचे पुण्याप्रति प्रेम असल्यामुळे पिंपरी-चिंचवडवर त्यांचे प्रेम नसल्यामुळे या शहराच्या विकासाबाबत काहीही सोयरसुतक नाही, असाही हल्लाबोल पवार यांनी केला. मंत्रालय हे आत्महत्यालय झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधारी मंत्र्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. बुलेट ट्रेन च्या माध्यमातून आर्थिक राजधानी गुजरातला घेऊन जाण्याचा घाट भाजपचा आहे ते हाणून पाडण्याआठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे पवार म्हणाले.

यावेळी बोलताना माजी मंत्री आ. जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीत जी आश्‍वासने दिली ती निवडणुकीनंतर जुमला असल्याचे जाहीर केल्यामुळे निवडणुकीत आश्‍वासनांचे गाजर दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मोदी, शहा काय म्हणाले होते हे त्यांनी आंदोलनाच्या वेळी स्क्रीनवर दाखवले. रोजगाराच्या थापा मारल्या. आशा थापाड्या  लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. भोसरीतील गुंडगिरी संपवावायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाशिवाय पर्याय नाही, असे मत माजी आ. विलास लांडे यांनी व्यक्त केले. पालिका व इतर माध्यमातून सत्ताधार्‍यांनी भ्रष्टाचाराचे खोरेच लावले आहे. राजकारणात कोणी ताम्रपट घेऊन आला नाही. यापुढे जशास तसे उत्तर देऊन भोसरीकरांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लांडे यांनी या वेळी जाहीर केले. यावेळी चित्रा वाघ, आ. शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

भाजपच्या गाजराला भुलू नका : पवार

देशाचे राजकारण शरद पवार यांच्या बाजूने फिरत आहे. त्यामुळे दिल्ली राखण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार जास्तीतजास्त निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे.  भाजपने निवडणुकीच्या अगोदर जी आश्‍वासने दिली ती फक्त निवडणुकीच्या तोंडावरील जुमला आहे, असे सांगत आल्यामुळे धादांत खोटे बोलणार्‍या भाजपच्या गाजराला आता भुलू नका, असे पवार म्हणाले.

 

Tags : pimpri, pimpri news, Bhosari, ncp hallabol meeting,