Thu, Apr 18, 2019 16:33होमपेज › Pune › भाजपने पवना जलवाहिनीचे काम का नाही थांबवले ?

भाजपने पवना जलवाहिनीचे काम का नाही थांबवले ?

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:41AMकामशेत : वार्ताहर 

राज्यात आमची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड शहरासाठी आम्ही पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू केले होते; परंतु तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने या प्रकल्पास विरोध केला होता. आता राज्यात भाजपचे सरकार असूनही या बंदिस्त जलवाहिनीचे काम का थांबवत नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारला केला. 

कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (दि. 11) आयोजित हल्लाबोल आंदोलनात अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री मदन बाफना, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, संत तुकाराम साखर कारखाना उपाध्यक्ष बापू साहेब भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, शशिकांत शिंदे,   चित्रा वाघ, माजी आमदार कृष्णराव भेगडे,  पुणे जि.प.चे अध्यक्ष विश्वास देवकाते , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे, बबन भेगडे,  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अर्चना घारे, नगरसेवक गणेश खांडगे, गणेश काकडे, संतोष भेगडे, अरुण माने, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे आदी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, भाजप सरकारचे शेतकर्‍यांविषयीचे प्रेम ढोंगी आहे; तसेच कामशेतमध्ये कचर्‍यामुळे निर्माण झालेल्या समस्येचाही त्यांनी समाचार घेत हेच का ‘स्वच्छ अभियान’ असा प्रश्‍न उपस्थित केला.  खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणाची सुरवात केली होती व सावित्रीबाई यांचेदेखील मोलाचे योगदान असल्याने त्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  मागील तीन वर्षांत राज्यात महिलांवरील हिंसाचार, स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात आणलेले राजकारण यामुळे मला एक आई म्हणून चिंता वाटत आहे, म्हणून येत्या आठवडाभरात ही पुस्तके न बदलल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा अनेक गोष्टींसाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे. मुख्यमंत्र्यांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असाही  सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला. 

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, भाजपच्या चौकीदारांनी चार वर्षांत काहीच केले नाही. देशातील काही जण कोटींची कर्जे बुडवून देशातून फरार झाले, तेव्हा हे चौकीदार काय करत होते; तसेच भाजपच्या काळात न्यायव्यवस्थेवर देखील विपरित परिणाम होत आहे.  धनंजय मुंडे म्हणाले, कामशेत ग्रामपंचायतींने आज हल्लाबोल आंदोलन असल्याने नाल्याची झाकणे उघडी ठेवून वास सोडला आहे.  यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे;  परंतु भाजपच्या नेत्यांनो हे लक्षात ठेवा की, आम्ही महाराष्ट्रात व देशात भाजपचा वासदेखील  ठेवणार नाही.  

पंतप्रधान मोदी देशात तीनकोटी नवीन रोजगार आणणार होते ते कुठे गेले, काळा पैसा कुठे आहे, असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले; तसेच कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यामुळे हे फसवे सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. दरम्यान, बुधवारी सकाळी अकरा वाजता वडगाव येथून कामशेतपर्यंत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी केले; तसेच  बाळासाहेब नेवाळे , बापू भेगडे,  मदन बाफना यांनीदेखील तालुक्यातील हेवेदावे विसरून पक्ष वाढीसाठी काम करावे असे वक्तव्य केले.