Sun, Apr 21, 2019 00:41होमपेज › Pune › सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे सरकार : अजित पवार 

सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे सरकार : अजित पवार 

Published On: Apr 11 2018 7:18PM | Last Updated: Apr 11 2018 7:18PMपुणे : प्रतिनिधी

सत्तेवर आल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने गोरगरिबांसाठी काहीच केले नाही. हे सरकार गोरगरिबांचे नाही तर सुटबुटातील लोकांचे आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री वारंवार खोटं बोलून जनतेची फसवणुक करत आहेत. केंद्र व राज्य सरकार बेजबाबदार आणि सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे सरकार आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांवर केला. 

भाजपप्रणीत केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात रान उठविण्याठी राष्ट्रावादी काँग्रेसने राज्यात सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनांतर्गत बुधवारी पुण्यातील वारजे येथे निषेध सभा झाली. या सभेत अजित पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंढे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्षा खा. अॅड. वंदना चव्हाण, माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकते यांच्यासह शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, आम्ही पिंपरी-चिंचवड आणि पुण्याची कामे केली, तरीही आम्हाला नाकारले. दोन्ही शहरामध्ये प्रामाणिकपणे विकासाची शाश्वत कामे केली. आज पालकमंत्र्यांना शहर आणि जिल्ह्याचा समन्वय ठेवता येत नाही. बीडीपीची जागा कशी शिवसृष्टीला देऊ शकता. पुणेकरांना खोट बोलून का फसवता. भाजपचे  खासदार, आमदार काय करत आहेत? कोणालाच कळत नाही. 

कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक देशातून पळून जात आहेत. मोठी कर्ज काढणाऱ्यांना कोट्यावधीची सूट दिली जाते. मग शेतकऱ्यांना का सूट दिली जात नाही. मग हे सरकार गोरगरीबांचे शेतकऱ्यांचे आहे की उद्योगपतींचे हे जनतेनेच ठरविले पाहिजे. या दोन्ही सरकारने पुण्यासाठी काय केले, हे कोणी भाजपवाले छातीठोक सांगतील का? सरकार मनुवादी वृत्ती वाढविण्याचे काम करत आहे. रामदास आठवले यांना मंत्री केले म्हणजे दलितांचे प्रश्न सुटले, असे भाजपने समजू नये, असेही पवार म्हणाले. 

धनंजय मुंढे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारचा खोटारडेपण आणि फसवणुकीच्या विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. अण्णा हजारेंच्या दिल्लीतील आंदोलनामुळे देशात परिवर्तनाची लाट आली. या लाटेचा फायदा भाजपने घेतला. मोदींच्या देशभर जाहीर सभा घेतल्या. मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा घरा-घरात आणि गावा-गावात होत आहे. मोदींच्याच सरकारमधील मंत्री अच्छे दिनची चेष्टा करत आहेत. काही मोदी भक्तांना अजूनही वाटतंय निवडणुकीपर्यंत मोदी वीस पंचवीस हजार तरी देतील.

असेच चालले तर प्रत्येकाच्या खात्यात नाहीत तर डोक्यावर पंधरा लाखाचे कर्ज झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या तरूणांनी मोदींना देशाच्या सिंहासनावर बसविले, त्या तरूणांनाच मोदींनी रोजगार न देता त्यांची फसवणुक केली. महापुरुषांना संघाशी जोडले जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र "फसव"णीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, धनगर समाजास आरक्षण देऊ, राज्य भ्रष्टाचारमुक्त करू, राज्याचा कारभार पारदर्शक करू, अशी फसवी आश्वासन दिले.  राज्यातील १६ मंत्र्यांनी विविध घोटाळे करून कोट्यावधी खाल्ले. सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. फसव्या योजनांना नाव देऊन शिवाजी महाराजांचा अवमान करू नका. स्वत:च वय पाहून मुख्यमंत्र्यांनी टीका करावी. पवार साहेबांवर टीका करण्याची तुमची लायकी नाही. 

जयंतराव पाटील म्हणाले, निवडणुकीत दिलेली आश्वासने मोदींनी पाळली नाहीत. कोट्यावधी युवकांना नोकरी देण्याचे काय झाले. सत्तेत येण्याआधी मोदी म्हणत होते मला पंतप्रधान नाही चौकीदार करा. आमच्यावेळी आरोप झालेले तुरूंगात गेले. चौकीदाराच्या काळात पैसे लाटून अनेकजण परदेशी गेले. हे लोक पळून जात असताना चौकीदार काय करत होते. मुख्यमंत्र्यांनी दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना कायम गुंगीत कसे ठेवायचे हे भाजपकडून शिकायला पाहिजे. खोटे बोलून लोकांना भ्रमात ठेवण्याची कला भाजपकडे आहे. निवडणुकीनंतर भाषा बदलणाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

सुनिल तटकरे म्हणाले, खोटे बोल पण रेटून बोल ही भाजपची निती. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून जनतेला फसविले. देशाच्या राजकारणात सध्या बदल झाला आहे. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे आज मनुवादी सत्ताधारी करत आहेत.  देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी पवार साहेब आहेत. देशातील विविध नेते साहेबांना भेटून त्यांचा सल्ला घेत आहेत. अशा वेळी साहेबांना ताकद देणे आपले कर्तव्य आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळ्या भागातील कार्यकर्ते एकत्र पाहुन आनंद होतोय. निवडणुकीनंतर अनेकजण आजच दिसत आहेत. सल्लाबोलची सुरूवात ही फक्त सत्तापरीवर्तनासाठी नाही. सत्तेची सवय झाल्यामुळे संघटनेत मरगळ आली होती. तीन साडेतीन वर्षात राज्यकर्त्यांचा कारभार पाहुन कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. त्यामुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. 

काँग्रेसने उपोषण केले म्हणून भाजपवाले उद्या उपोषण करत आहेत. संसद चालवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. उपोषण करण्याचा ढोंगीपणा भाजपणे करू नये. त्यांना उपोषणच करायचे होते, तर अधिवेशन सुरू असताना करायचे होते. अधिवेशन संपल्यावर गेलेल्या प्रसंगासाठी का उपोषण केले जात आहे. एक दिवस उपोषण करूण भाजप नेते कोणता तिर मारणार आहेत हे कळत नाही.

समान पाणी पुरवठा योजनेच्या फेरनिविदेत एक हजार कोटी वाचले. एक हजार कोटी कुणाच्या खिशात जाणार होते, हे पालकमंत्र्यांनी सांगावे. स्मार्ट सिटीचे पैसे फक्त सल्लागाराच्या घशात घातले आहेत. पुढचा महाराष्ट्र अजित दादांच्या नेतृत्त्वाखाली वाटचाल करणार आहे, असेही सुळे म्हणाल्या.

वंदना चव्हाण म्हणाल्या, विकासाचे स्वप्न दाखवून आलेल्या केंद्र, राज्य आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लोकांचा भ्रमनिरास केला आहे. शहरातील सत्ताधाऱ्यांचे लोकप्रतिनिधी दिसत नाहीत. खासदारांना आपण यांना पाहिले का ? असेच म्हणावे लागते. आमदार नगरसेवकासारखी कामे करतात. सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेडे बनवले आहे.

प्रास्ताविक करताना नगरसेवक सचिन दोडके  म्हणाले, सरकारच्या नाकरतेपणामुळे जनता चवताळली आहे. त्याच भावनेतून या सभेला जनसागर उसळला आहे. जेवढ्या वेगाने लाट आली, तेवढ्याच वेगाने त्यांना परत पाठवायचे आहे.  काका चव्हाण यांनी स्वागत केले.

Tags : ncp, halla bol yatra, pune, ajit pawar, criticise, bjp government, pune news